सलग दुसरे सत्र तेजीत : रिलायन्स, एचडीएफसी मजबूत
वृत्तसंस्था/ मुंबई
जागतिक पातळीवर सुरु असलेल्या घडामोडींचा काही प्रमाणात का असेना परिणाम हा आर्थिक क्षेत्रांवर होत असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये युक्रेन व रशिया यांच्यातील युद्धाजन्य स्थिती निवळण्यासाठी वेगवेगळय़ा मार्गांचा वापर करण्यावर भर दिला जात आहे. याचा काहीसा सकारात्मक परिणाम हा भारतीय भांडवली बाजारावर झाल्याचे बुधवारी दिसून आले.
दिग्गज कंपन्यांसोबत रिलायन्स इंडस्ट्रीज आणि एचडीएफसी यांच्या समभागात झालेल्या लिलावामुळे सेन्सेक्स व निफ्टी दोन टक्क्यांनी वधारुन बंद झाला आहे. प्रमुख समभागांमध्ये सुरुवातीला सकारात्मक वातावरण राहिल्याने गुंतवणूकदारांना समर्थन मिळाले याचा लाभ हा भारतीय बाजाराला झाला.
यामुळे दिवसभरातील कामगिरीनंतर बीएसई सेन्सेक्स 1,223.24 अंकांच्या उसळीसोबत निर्देशांक 54,647.33 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा 331.90 अंकांनी मजबूत होत निर्देशांक 16,345.35 वर बंद झाला आहे. प्रमुख कंपन्यांपैकी बुधवारी सेन्सेक्समध्ये एशियन पेन्ट्स, रिलायन्स इंडस्ट्रीज, बजाज फायनान्स, महिंद्रा ऍण्ड महिंद्रा, इंडसइंड बँक, बजाज फिनसर्व्ह, मारुती सुझुकी, एचडीएफसी बँक आणि अल्ट्राटेक सिमेंट यांचे समभाग फायद्यात राहिले आहेत. अन्य कंपन्यांमध्ये पॉवरग्रिड कॉर्प, एनटीपीसी, टाटा स्टील, नेस्ले इंडिया आणि विप्रो यांचे समभाग मात्र नुकसानीसोबत बंद झाले आहेत.
प्रमुख घडामोडींचा परिणाम
बुधवारच्या सत्रात विमान क्षेत्रातील कंपन्यांना मजबूत स्थिती प्राप्त झाली होती. दोन वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरु करण्यासाठी सरकारने घोषणा केल्याने विमान क्षेत्रातील समभाग तेजीत राहिले. दुसऱया बाजूला जागतिक पातळीवर युद्धजन्य स्थितीच्या वातावरणात मंगळवारच्या सत्रात भारतीय बाजारात तेजी परतली. यामुळे गुंतवणूकदारांनी गमावलेला आत्मविश्वास पुन्हा मिळवला असल्याचे पहावयास मिळाले आणि याचा लाभ बुधवारी दिसून आला.