श्रीनगर : वृत्तसंस्था
सीआरपीएफ जवानाची हत्या करणाऱया दहशतवाद्याला जम्मू-काश्मीर पोलिसांनी रविवारी अटक केली. त्याच्या ताब्यातून एक पिस्तूलही जप्त करण्यात आले आहे. पथकाने दहशतवाद्यासोबत आणखी एकाला अटक केली असून, तो आरोपीसोबत घटनास्थळी गेला होता. जम्मू-काश्मीरमधील शोपियानमधील छोटेपोरा गावात सुट्टीवर गेलेल्या सीआरपीएफ जवानाची दहशतवाद्यांनी गोळय़ा झाडून हत्या केली होती. या घटनेनंतर सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला. जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शोपियानचे रहिवासी असलेले सीआरपीएफ जवान मुख्तार अहमद दोही यांच्यावर गोळीबार करून दहशतवादी फरार झाले होते. रुग्णालयात नेत असतानाच जवानाचा मृत्यू झाला होता.
कुपवाडा येथे चकमकीत एक दहशतवादी ठार
जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा येथे सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला आहे. झडती घेतली असता त्याच्या ताब्यातून शस्त्रसाठा सापडला. दहशतवाद्याची ओळख अद्याप पटलेली नाही, असे पोलीस अधिकाऱयाने सांगितले. शनिवारी जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. तसेच अन्य तीन ठिकाणी झालेल्या संघर्षामध्ये शनिवारी दिवसभरात चार दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले होते.