कोल्हापूर/प्रतिनिधी
कोल्हापुरात मध्यवर्ती बसस्थानकात आज दुपारी प्रवाशांनी भरलेली बस आली आणि प्रवाशांसह नागरिकांच्या काळजाचा ठोका चुकला. पुणे-कोल्हापूर-पणजी जाणारी शिवशाही बसचा अचानकपणे ब्रेक फेल झाल्यामुळे बस स्टँड परिसरात अपघात झाला. प्रवाशांनी भरलेल्या आणि गजबजलेल्या सीबीएस परिसरात झालेल्या या थरारामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र काही वर्षांपूर्वी उमा टॉकीज चौक येथे घडलेल्या घटनेची आठवण झाली.
आज दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास पुणे-कोल्हापूर-पणजी ही शिवशाही बस प्रवाशी भरून कोल्हापूर बस स्टँड मधून पणजीकडे निघाली होती. महालक्ष्मी चेम्बर्सच्या दारात बस आली असता प्रवासी घेण्यासाठी शिवशाही बस थांबली असता अचानक बसचा ब्रेक फेल झाला. त्यामुळे बस अचानकपणे पाठीमागे जावू लागली. सतत गर्दीत असणाऱ्या बस स्टँड परिसरात अचानकपणे ही घटना घडल्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आणि आरडा ओरड सुरु झाली. बसचा ब्रेक फेल झाले हे लक्षात येताच ड्रायव्हरने अत्यंत सावधगिरीने आणि प्रसंगावधान राखून गाडी अतिशय काळजीपूर्वक महालक्ष्मी चेम्बर्स च्या एका बंद असलेल्या गाऴ्याला पाठीमागून धडकवली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र ४ मोटारसायकल आणि एका चारचाकीचे यामध्ये नुकसान झाले. शिवशाही ब्रेक फेल चा हा थरार बघणाऱ्यांच्या काळजाचा ठेका चुकवणारा होता.