ऑनलाईन टीम/तरुण भारत
बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आता मोठ्या अडचणीत सापडली आहे. २०० कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाच्या रडारवर ती आहे. आता अंमलबजावणी संचालनालयाने तिला मोठा दणका दिला आहे. ईडीने सुकेश चंद्रशेखर खंडणी प्रकरणात जॅकलिन फर्नांडिसची ७.२७ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. यापूर्वी ५ डिसेंबर २१ रोजी देशाबाहेर जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या या अभिनेत्रीला मुंबई विमानतळावर थांबवण्यात आले होते. तिच्याविरोधात ईडीने लुकआउट नोटीस जारी केली आहे. (ED attaches Rs 7 crore assets of actress Jacqueline Fernandez)
दरम्यान, आयकर विभागानं जॅकलिनच्या विरोधात आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई करत तिची संपत्ती जप्त केली आहे. ज्यात तिच्या ७.१२ कोटी रुपयांच्या फिक्स डिपॉझिटचाही समावेश आहे. मनी लँड्रिंगच्या प्रकरणात फसलेल्या जॅकलिन फर्नांडिसच्या विरोधात आयकर विभागानं केलेली ही सर्वात मोठी कारवाई आहे.
काही महिन्यांपूर्वी अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचं नाव २०० कोटींच्या मनी लँड्रिंग प्रकरणातील ठग सुकेश चंद्रशेखर यांच्याशी जोडलं गेल्यानंतर जॅकलिन आयकर विभागाच्या रडारवर होती. दरम्यानच्या काळात जॅकलिनची कसून चौकशी देखील झाली होती. मात्र स्वतःवर लावण्यात आलेल्या आरोपांचं जॅकलिननं खंडन केलं होतं. सुकेश चंद्रशेखरसोबतचं रिलेशनशिप देखील तिने अमान्य केलं होतं. आता आयकर विभागानं जॅकलिनवर कारवाई करत तब्बल ७.२७ कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे.
ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेत्री जॅकलिन आणि कॉनमॅन सुकेश चंद्रशेखर हे रिलेशनमध्ये होते. यावेळी सुकेश चंद्रशेखर जॅकलिनवर मोठ्या प्रमाणात पैसे खर्च केला. तसेच चंद्रशेखरने जॅकलिनला सोन्याचे आणि हिऱ्याचे दागिने, आयात केलेली क्रॉकरी दिली होती. याशिवाय ५२ लाख रुपये किमतीचा घोडा आणि ९-९ लाख रुपये किमतीच्या चार पर्शियन मांजरीही भेट म्हणून देण्यात आल्या होत्या. सुकेशने जॅकलिनसाठी अनेक चार्टर्ड फ्लाइट्स बुक केल्या होत्या. ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रशेखरने जॅकलिनवर सुमारे१० कोटी रुपये खर्च केले होते.