कामगार दिनानिमित्त आयोजन : गौरवमूर्तींकडून सत्काराबद्दल कृतज्ञता
प्रतिनिधी /बेळगाव
पूर्वी कारखान्यात काम करण्यासाठी फक्त पुरुष मंडळी जात असत. पण गेल्या काही वर्षांमध्ये औद्योगिक क्षेत्रातसुद्धा महिला कामगार आघाडीवर असल्याचे मत जायंट्स सखीच्या संस्थापिका अध्यक्षा ज्योती अनगोळकर यांनी व्यक्त केले. कामगार दिनानिमित्त आयोजित गौरव कार्यक्रमप्रसंगी त्या बोलत होत्या.
व्यासपीठावर अध्यक्षा चंद्रा चोपडे, माजी अध्यक्षा नीता पाटील, फेडरेशन सदस्या नम्रता महागावकर उपस्थित होत्या. यावेळी उद्यमबाग परिसरातील वेगवेगळय़ा ठिकाणी सीएनसी मशीन तसेच ग्रॅनाईट ग्राइंडिंग मशीनवर काम करणाऱया बेबी चव्हाण, मंजुळा बडीगेर, पुष्पा हगदाळकर, कीर्ती सुतार, गौरी मुतकेकर, भारता पाटील, लक्ष्मी मुतगेकर या महिलांचा चंद्रा चोपडे, नीता पाटील, नम्रता महागावकर, ज्योती अनगोळकर, विद्या सरनोबत, अपर्णा पाटील, अर्चना पाटील यांच्या हस्ते साडी-चोळी, स्मृतिचिन्ह आणि गुलाबपुष्प देऊन गौरविण्यात आले. गौरवमूर्ती महिलांनी सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. कवयित्री स्मिता पाटील यांनी कामगार दिनावर उत्कृष्ट कविता सादर केली.
अध्यक्षा चंद्रा चोपडे यांनी कामगार दिनाचे महत्त्व सांगितले. यावेळी बहुसंख्येने जायंट्स सखीच्या सदस्या उपस्थित होत्या. सूत्रसंचालन सचिव सुलक्षणा शिनोळकर यांनी केले. आभार उपाध्यक्षा विद्या सरनोबत यांनी मानले.