ऑनलाईन टीम / पुणे :
देशात पेट्रोल-डिझेलच्या वाढलेल्या किमतींमुळे जनता हैराण असतानाच पेट्रोलियम कंपन्यांनी घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात आज 50 रुपयांची वाढ केली. (domestic gas cylinder increased by Rs 50) त्यामुळे 14.2 किलोच्या गॅस सिलिंडरसाठी हजार रुपये मोजावे लागणार आहेत. त्यामुळे गृहिणींचं घरखर्चाचं बजेट आता वाढणार आहे.
घरगुती वापराच्या 14.2 किलोच्या गॅस सिलिंडरसाठी यापूर्वी 949.50 पैसे मोजावे लागत होते. आता हा सिलिंडर हजार रुपयांना मिळणार आहे. मागील 10 महिन्यात एलपीजी सिलिंडर 165.50 रुपयांनी महागला आहे. नवीन दरानुसार मुंबईत आता 14.2 किलोचा गॅस सिलिंडर 999.50 रुपयांना मिळणार आहे. तर तर दिल्लीतही या सिलिंडरसाठी 999.50 रुपये मोजावे लागतील. एलपीजीची किंमत मुख्यत्वे क्रूडच्या आंतरराष्ट्रीय किमतींवर अवलंबून असते. कच्चा तेलाच्या किंमतीत वाढ झाल्याने आता गॅसही महागला आहे.
दरम्यान, एक मे रोजी 19 किलोच्या व्यवसायिक गॅस सिलिंडरच्या दरात देखील वाढ करण्यात आली होती. एक मे ला व्यवसायिक सिलिंडरचे दर 104 रुपयांनी वाढवण्यात आले होते. त्यामुळे व्यावसायिक गॅस सिलिंडर 2355.50 रुपयांवर पोहचला आहे. तर 5 किलोच्या व्यावसायिक सिलिंडरची किंमत 655 रुपये आहे.