60 नागरिक मारले गेल्याची भीती
रशियाने युक्रेनच्या लुहान्स्कमध्ये एका शाळेवर हवाई हल्ले केले आहेत. या शाळेत सुमारे 90 नागरिकांनी आश्रय घेतला होता. या हल्ल्यांमध्ये सुमारे 60 जण मारले गेल्याची भीती असल्याचे लुहान्स्कचे गव्हर्नर सेरही हैदैस यांनी सांगितले आहे. बचाव पथकाने या शाळेतून 30 लोकांना बाहेर काढले असून यात गंभीर जखमी असलेल्या 7 महिलांचा समावेश आहे.
रशिया दरवर्षी 9 मे रोजी विजय दिन साजरा करतो. दुसऱया महायुद्धात या दिवशी रशियाच्या सैन्याने हिटलरच्या नाझी सैन्याला पराभूत केले होते. या दिवसाचे महत्त्व पाहता रशियाचे राष्ट्रपती पुतीन 9 मे रोजी युक्रेनविरोधात युद्धाची घोषणा करू शकतात. आतापर्यंत रशियाने युक्रेनवरील हल्ल्याचा केवळ एक विशेष मोहीम संबोधिले आहे.
दुसरीकडे युक्रेनला पाश्चिमात्य देशांकडून मदत मिळण्याचे सत्र सुरूच आहे. आता युक्रेनियन सैन्याला तुर्कस्तानात निर्माण 12 बेयरेकतार टीबी-2 ड्रोन मिळाले आहेत. मागील 8 वर्षांमध्ये तुर्कस्तानने 400 हून अधिक बेयरेकतार टीबी-2 ड्रोन विकसित केले असून यातील 96 ड्रोनची विक्री केली आहे. या ड्रोनला अत्याधुनिक मानले जाते.
ब्रिटिश पंतप्रधान बोरिस जॉन्सन हे युक्रेनला 1.3 अब्ज पाउंडची सैन्य मदत पाठविणार आहेत. 7 मे रोजी पूर्व युक्रेनमध्ये 107 रशियन सैनिकांना कंठस्नान घातल्याचा दावा करण्यात येत आहे. तर युक्रेन सरकारने देश चालविण्यासाठी जागतिक बँकेकडून 1.5 अब्ज डॉलर्सचे कर्ज घेण्याच्या मसुद्याला मंजुरी दिली आहे.
मारियुपोलमधील बचावकार्य
मारियुपोलच्या अजोवस्टल स्टील प्रकल्पात अडकून पडलेल्या महिला, मुले आणि वृद्धांना बाहेर काढण्यात आले आहे. युक्रेनचे उपपंतप्रधान इरीना वीरेशचुक यांनी यासंबंधी माहिती दिली आहे. परंतु सध्या काही युक्रेनियन सैनिक तेथे अडकून पडले असून त्यांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.
तुर्कमेनिस्तान, ताजिकिस्तानचा पुढाकार
तुर्कमेनिस्तान आणि ताजिकिस्तानने रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांचा दबाव धुडकावून लावत 7 हेलिकॉप्टर्स आणि लढाऊ विमाने युक्रेनला सोपविली आहेत. मागील वर्षी ऑगस्टमध्ये अफगाणिस्तानात तालिबानची राजवट आल्यावर अफगाण वैमानिकांनी स्वतःची विमाने तुर्कमेनिस्तान आणि ताजिकिस्तानात नेली होती. अफगाणिस्तान सैन्याची 57 लढाऊ विमाने अद्याप तुर्कमेनिस्तान-ताजिकिस्तानात आहेत. दोन्ही देशांनी ही लढाऊ विमाने युक्रेनला देण्याची घोषणा केली आहे. अमेरिकेचे सैन्य अफगाणिस्तानात असताना तेथे 131 विमाने होती. उर्वरित विमाने आता तालिबानच्या ताब्यात आहेत.