वॉशिंग्टन :
जागतिक स्तरावर होणाऱया 90 लाख मृत्यूंसाठी सर्वप्रकारचे प्रदूषण जबाबदार असल्याचा दावा एका नव्या अध्ययनात करण्यात आला आहे. तर वायू प्रदूषणामुळे मृत्युमुखी पडणाऱयांच्या संख्येत 2000 सालानंतर 55 टक्क्यांची वाढ झाली आहे.
द लॅन्सेट प्लॅनेटरी हेल्थ जर्नलमध्ये प्रकाशित एका नव्या अध्ययनानुसार अमेरिका प्रदूषणाप्रकरणी होणाऱया मृत्यूंप्रकरणी पहिल्या 10 देशांपैकी एक आहे. 2019 मध्ये प्रदूषणामुळे झालेल्या 1,42,883 मृत्यूंसह अमेरिका जगात सातव्या स्थानावर आहे. या यादीत बांगलादेशचाही समावेश आहे. भारतात वर्षाला सुमारे 24 लाख लोकांचा तर चीनमध्ये 22 लाख लोकांचा मृत्यू प्रदूषणामुळे होतो. परंतु या दोन्ही देशांमधील लोकसंख्येचे प्रमाण अधिक आहे.
2019 मधील 90 लाख मृत्यूंपैकी 66.7 लाख मृत्यू वायुप्रदूषणामुळे झाले आहेत. तर जलप्रदूषणामुळे 13.6 लाख जणांना जीव गमवावा लागला. 2019 मध्ये रासायनिक प्रदूषणामुळे 18 लाख जणांचा मृत्यू ओढवला होता. प्रदूषणामुळे जीवितहानी होण्यासह प्रचंड आर्थिक नुकसान देखील होत असते. 2019 मध्ये प्रदूषणामुळे सुमारे 365.66 लाख कोटींचे आर्थिक नुकसान झाले होते. हे प्रमाण जागतिक आर्थिक उत्पादनाच्या 6.2 टक्क्यांइतके आहे. प्रदूषणामुळे होणाऱया आर्थिक नुकसानाचा भार सर्वाधिक कमी उत्पन्नगटाच्या देशांवर पडत आहे.