मृत मध्यप्रदेशमधील ः यमुनोत्री महामार्गाजवळ दुर्घटना ः बसमध्ये 30 हून अधिक प्रवासी
उत्तरकाशी / वृत्तसंस्था
मध्यप्रदेशातील यात्रेकरूंनी भरलेली बस उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथे रविवारी दरीत कोसळली. सायंकाळच्या सुमारास घडलेल्या या दुर्घटनेत रात्री 9 वाजेपर्यंत 15 जणांचे मृतदेह सापडले होते. तर 6 जणांना गंभीर जखमी अवस्थेत दरीबाहेर काढण्यात आले असून काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले. घटनास्थळी पोलीस आणि बचाव पथक रात्री उशिरापर्यंत सक्रिय होते. राज्याचे डीजीपी अशोक कुमार यांनी 15 मृतांच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. सर्व प्रवासी मध्यप्रदेशातील पन्ना जिल्हय़ातील असल्याचे सांगण्यात आले.
मध्यप्रदेशमधील बस 30 हून अधिक प्रवाशांना घेऊन यमुनोत्रीला जात असताना रविवारी भीषण रस्ते अपघात झाला. बस दरीत कोसळून किमान 15 जणांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या अपघातानंतर उत्तरकाशीचे जिल्हा दंडाधिकारी अभिषेक रुहेला यांच्यासह वरि÷ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री या देवस्थानांसह यमुनोत्रीला चारधाम म्हणून ओळखले जाते. अपघातग्रस्त बसमधील प्रवासी चारधामला जात असताना ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त करत मुख्यमंत्री धामी यांनी जिल्हा प्रशासनाला मदत आणि बचावकार्य जलदगतीने करण्याचे निर्देश दिले. जखमींवर योग्य उपचार करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.
यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावर दामटाजवळ भीषण अपघात झाला आहे. हरिद्वारहून निघालेली बस (युके-04 पीए-1541) अनियंत्रित होऊन दरीत कोसळली. चालक-वाहक वगळता बसमध्ये 28 प्रवाशांची आसनव्यवस्था होती. तथापि, प्रवासादरम्यान 30 हून अधिक प्रवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले. बस दरीत पडताच गोंधळ आणि आरडाओरडा झाला. अपघातात बळी पडलेल्या बसचा चक्काचूर झाल्याचे छायाचित्रांवरून स्पष्ट होत आहे.