मे महिन्यातील रेपोदर वाढीचा प्रभाव ः कर्जदरात 0.9 टक्क्यांची वाढ
नवी दिल्ली
महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने 4 मे रोजी रेपोदरात 0.40 टक्क्यांची वाढ केली होती. याचा परिणाम हा कर्जावरील व्याजदरावर दिसला आहे. कर्ज महाग करत बँकांनी आपले नवे दर सादर करण्यास सुरुवात केली आहे. मात्र बचत करण्यात येणाऱया रक्कमेवर (ठेवी) आकारण्यात येणारे दर मात्र स्थिर ठेवले आहेत. या पाठोपाठ मागील आठवडय़ातही आरबीआयने रेपोदर वाढवून तो 4.9 इतका केला आहे.
रेपोदरात 4 मे रोजी पहिल्यांदा वाढ केल्यानंतर आतापर्यंत 17 बँकांनी आपले गृहकर्ज महाग केले आहे. ज्यामध्ये जमा करण्यात येणाऱया रकमेवरच्या (ठेवी) दरात 11 बँकांनी वाढ केली आहे. यात कर्जदरात वाढ करणाऱया बँकांनी 0.50 ते 0.90 टक्के वाढ केली आहे, ज्यात बचत ठेवीवर दर 0.10 ते 0.35 टक्क्यांनी वाढवला आहे.
देशातील सर्वात मोठी आघाडीवरची बँक स्टेट बँक यांनी कर्जदरात 0.40 टक्क्यांची वाढ केली आहे, यासोबत बँकेने मुदतबंद ठेवीच्या दरात वाढ केली आहे.