अवघ्या 51 चेंडूत 80 धावांची आतषबाजी
पल्लेकेल्ल्ले
ग्लेन मॅक्सवेलच्या तुफानी फटकेबाजीच्या जोरावर पाच सामन्यांच्या वन डे मालिकेत ऑस्ट्रेलियाने विजयी सलामी देताना यजमान लंकेचा डकवर्थ-लेविस नियमाच्या आधारे 2 गडय़ांनी पराभव केला. सामनावीर मॅक्सवेलने 51 चेंडूत 6 षटकार आणि 6 चौकारांसह नाबाद 80 धावांची खेळी केली.
या सामन्यात लंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. लंकेने 50 षटकात 7 बाद 300 धावा जमविल्या. लंकेचा डाव संपल्यानंतर पावसामुळे सुमारे दीड तासांचा खेळ वाया गेल्याने पंचांनी ऑस्ट्रेलियाला 44 षटकात 282 धावांचे सुधारित लक्ष्य दिले. ऑस्ट्रेलियाने 42.3 षटकात 8 बाद 282 धावा जमवित हा सामना 9 चेंडू बाकी ठेवून 2 गडय़ांनी जिंकला.
लंकेच्या डावात गुणतिलका, निशांका आणि कुशल मेंडिस यांनी शानदार अर्धशतके झळकविली. गुणतिलका आणि निशांका या सलामीवीरांनी 19.4 षटकात 115 धावांची शतकी भागीदारी केली. चोरटी धाव घेण्याच्या नादात गुणतिलका धावचीत झाला. त्याने 53 चेंडूत 7 चौकारांसह 55 धावा झळकविल्या. ऑस्ट्रेलियाच्या ऍगरने निशांकाला झेलबाद केले. त्याने 68 चेंडूत 1 षटकार आणि 6 चौकारांसह 56 धावा जमविल्या.
कुशल मेंडिसने एका बाजूने संघाची बाजू सावरत शेवटपर्यंत नाबाद राहिला. कुशल मेंडिसने 87 चेंडूत 1 षटकार आणि 8 चौकारांसह 86 धावा झोडपल्या. असालेंकाने 42 चेंडूत 4 चौकारांसह 37 तर हसरंगाने 19 चेंडूत 6 चौकारांसह 37 धावांचे योगदान दिले. लंकेच्या डावात 2 षटकार आणि 33 चौकार नोंदविले गेले. ऑस्ट्रेलियातर्फे ऍगरने 49 धावात 2 तसेच लाबुसिंगेने 19 धावात 2, हॅझलवूड आणि जे. रिचर्डसन यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. लंकेने 50 षटकात 7 बाद 300 धावा जमवित ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 301 धावांचे आव्हान दिले होते.
लंकेचा डाव संपल्यानंतर मुसळधार पावसाला प्रारंभ झाल्याने सुमारे 90 मिनिटांचा खेळ वाया गेला. पंचांनी ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 44 षटकात 282 धावांचे नवे उद्दिष्ट विजयासाठी दिले होते. ऑस्ट्रेलियाच्या डावाला चांगली सुरुवात झाली नाही. डावातील दुसऱया षटकातच सलामीचा वॉर्नर खाते उघडण्यापूर्वीच तिक्षणाच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. फिंच आणि स्मिथ या जोडीने दुसऱया गडय़ासाठी 67 धावांची भर घातली. डिसिल्वाने फिंचला झेलबाद केले. त्याने 41 चेंडूत 1 षटकार आणि 5 चौकारांसह 44 धावा जमविल्या. स्टिव्ह स्मिथने 60 चेंडूत 5 चौकारांसह 53 तर लाबूसिंगेने 31 चेंडूत 1 चौकारासह 24 धावा जमविल्या. स्टोनीसने 31 चेंडूत 2 षटकार आणि 4 चौकारांसह 44 धावांचे तर कॅरेने 22 चेंडूत 1 चौकारासह 21 धावांचे योगदान दिले.
30 षटकात ऑस्ट्रेलियाची स्थिती 5 बाद 189 अशी होती. ऑस्ट्रेलियाने 5 बाद 228 धावा जमविल्या असताना त्यांची स्थिती समाधानकारक होती. पण त्यानंतर लंकेच्या हसरंगाने 3 चेंडूमध्ये ऑस्ट्रेलियाच्या कॅरे आणि कमिन्स यांना बाद केल्याने सामन्याला अधिकच रंगत आली. पण, आक्रमक फटकेबाजी करणाऱया मॅक्सवेलने आपल्या संघाला 9 चेंडू बाकी असताना थरारक विजय मिळवून दिला. मॅक्सवेलची मॅचविनिंग खेळी लंकेला पराभूत करणारी ठरली.
मॅक्सवेलने शेवटच्या क्षणी सलग दोन षटकार ठोकून आपल्या संघाला विजयी केले. वन डे क्रिकेटमध्ये यापूर्वी लंकेविरुद्ध ऑस्ट्रेलियाने पाठलाग करताना 267 पेक्षा अधिक धावांचे उद्दिष्ट गाठले नव्हते. पण, यावेळी त्यांनी लंकेविरुद्ध पाठलाग करताना विक्रमी धावसंख्या गाठून विजय नोंदविला. ऑस्ट्रेलियाच्या डावामध्ये 9 षटकार आणि 22 चौकार नोंदविले गेले. लंकेतर्फे हसरंगाने 58 धावात 4 तर वेलागेने 2 आणि शनाका व महेश तिक्ष्णा यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक
लंका- 50 षटकात 7 बाद 300 (गुणतिलका 55, निशांका 56, कुशल मेंडीस नाबाद 86, असालेंका 37, हसरंगा 37, ऍगेर 2-49, लाबूसिंगे 2-19, हॅझलवूड 1-54, रिचर्डसन 1-64), ऑस्ट्रेलिया- (विजयासाठी 44 षटकात 282 धावांचे उद्दिष्ट) 42.3 षटकात 8 बाद 282 (मॅक्सवेल नाबाद 80, स्टोनीस 44, लाबूसिंगे 24, फिंच 44, स्मिथ 53, कॅरे 21, हसरंगा 4-58, तिक्ष्णा 1-51, वेलागे 2-49, शनाका 1-27).