ऑनलाईन टीम / तरुण भारत :
केंद्र सरकारने सोन्यावरील मूळ आयात शुल्कात 5 टक्क्यांची वाढ केली आहे. त्यामुळे सोन्यावरील आयात शुल्क आता 12.5 टक्के झाले असून, सोने खरेदी महागणार आहे.
भारतातील लोक गुंतवणूक म्हणून मोठय़ा प्रमाणात सोने खरेदी करतात. सोने खरेदीमध्ये भारताचा जगात दुसरा क्रमांक लागतो. कोरोना काळात सोने खरेदी मंदावली होती. पण लाट ओसरल्यानंतर पुन्हा सोने खरेदीत वाढ झाली. भारतीय ग्राहकांची सोन्याची मागणी पूर्ण करण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर सोन्याची आयात केली जाते. पण सोने आयातीमुळे रुपयावर मोठा दबाव पडतो. डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या मूल्याने ऐतिहासिक नीचांकी दर गाठला होता. रुपयातील घसरण थांबविण्यासाठी केंद्र सरकार ठोस पाऊले उचलत आहे.
मे 2021 मध्ये भारताने 107 टन सोन्याची आयात केली होती. ही आयात 2020 च्या तुलनेत 9 पट जास्त होती. त्यामुळे सोन्याच्या आयातीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि रुपयाला सावरण्यासाठी केंद्र सरकारने आयात शुल्कात वाढ केली आहे. दरम्यान, याउलट स्थानिक बाजारपेठा मजबूत करण्यासाठी अमेरिका, सिंगापूर आणि चीन यासारख्या देशांनी सोन्याच्या आयातीवरील इम्पोर्ट डय़ुटीच काढून टाकली आहे.