गुप्तचर यंत्रणांच्या इशाऱयानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क
वृत्तसंस्था / श्रीनगर
200 हून अधिक दहशतवादी जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरी करण्याच्या तयारीत आहेत. गुप्तचर यंत्रणांनुसार पाकव्याप्त काश्मीरमधील लाँच पॅडवर हे दहशतवादी घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात आहेत. गुप्तचर यंत्रणांचा इशारा पाहता सीमा सुरक्षा दल आणि सैन्याने नियंत्रण रेषेवरील गस्त अधिकच वाढविली आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरी करण्यासाठी भुयार तसेच नदीमार्गाचा वापर करण्याचा प्रयत्न दहशतवाद्यांनी चालविला आहे. हे दहशतवादी लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद तसेच हिजबुज मुजाहिदीनशी संबंधित असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱयाने सांगितले आहे.
दहशतवाद्यांकडून घुसखोरीसाठी वापरल्या जाणाऱया मार्गांचा खुलासा झाल्याने ते आता भुयारांद्वारे आणि नदीच्या मार्गाने घुसखोरी करू पाहत आहेत. राजौरी-पुंछ मार्ग, पीर पंजालच्या दक्षिणेकडील भागांमधून घुसखोरीचा प्रयत्न करत आहेत. घुसखोरीसाठी दहशतवाद्यांनी आता बऱयाचअंशी पीर पंजालच्या दक्षिण भागावर भर दिला आहे. तर काश्मीर खोऱयात घुसखोरी अन्य मार्गांच्या तुलनेत कमी झाल्याचे अधिकाऱयाने सांगितले.
नियंत्रण रेषेच्या पलिकडील या लाँच पॅड्सबद्दल इनपूट महत्त्वपूर्ण आहे, कारण 43 दिवसांपर्यंत चालणारी अमरनाथ यात्रा दोन वर्षांनी 30 जून रोजी सुरू झाली आहे. चालू वर्षात आतापर्यंत खोऱयात नियंत्रण रेषेनजीक घुसखोरीचे बहुतांश प्रयत्न उधळून लावण्यात आले आहेत. तर घुसखोरीचे प्रयत्न करणारे अनेक दहशतवादी मारले गेले आहेत.
चालू वर्षात 28 जूनपर्यंत 121 दहशतवादी मारले गेले आहेत. यात लष्कर-ए-तोयबाचे 68, जैश-ए-मोहम्मदचे 29 आणि हिजबुल मुजाहिदीनचे 16 दहशतवादी होते. मारले गेलेल्या 121 दहशतवाद्यांपैकी 7 जणांची ओळख पटू शकली नव्हती. तर एक दहशतवादी इस्लामिक स्टेटशी संबंधित होता.