कचराकुंडय़ा दाखल : कचराकुंडय़ा बसविण्याचे काम लवकरच सुरू करणार
प्रतिनिधी /बेळगाव
शहरातील कचराकुंडय़ा हटवून स्वच्छ बेळगाव निर्माण करण्याचा प्रयत्न महापालिकेकडून सातत्याने केला जात आहे. मात्र नागरिकांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने कचरा टाकण्यासाठी भूमिगत कचराकुंडय़ा बसविण्यात येत आहेत. त्यामुळे महापालिकेने 18 भूमिगत कचराकुंडय़ा खरेदी केल्या असून सोमवारी या कचराकुंडय़ा दाखल झाल्या आहेत.
स्मार्ट सिटी बनविण्यासाठी कोटींचा निधी खर्च करण्यात आला. मात्र कचऱयाचे ढिगारे जैसे थे आहेत. कचराकुंडय़ा हटवून स्वच्छ करण्याचा प्रयत्न महापालिकेकडून सातत्याने केला जात आहे.
ब्लॉकस्पॉट हटविण्यासाठी शोभेची झाडे लावून विविध उपक्रम राबविले आहेत. तरीदेखील रस्त्याशेजारी आणि खुल्या जागेत कचरा टाकण्याचे प्रमाण कमी झाले नाही. त्यामुळे महापालिकेने हायटेक पद्धतीच्या भूमिगत कचराकुंडय़ा बसविण्याचा निर्णय घेतला होता. शिवाजी उद्यानाशेजारील रस्त्यावर प्रायोगिक तत्त्वावर भूमिगत कचराकुंडी बसविण्यात आली होती. कंटेनर उचलण्यासाठी हायटेक पद्धतीचे कॉम्पॅक्टरदेखील खरेदी करण्यात आले आहे. तसेच कचऱया साचणाऱया रस्त्यावर आणखी 18 ठिकाणी भूमिगत कचराकुंडय़ा बसविण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. याकरिता निधीची तरतूद करून निविदा मागविल्या होत्या.
18 कचराकुंडय़ा खरेदी केल्या असून सोमवारी हायटेक पद्धतीच्या जास्त क्षमतेच्या भूमिगत कचराकुंडय़ा दाखल झाल्या आहेत. 18 ठिकाणी या कचराकुंडय़ा बसविण्याचे काम लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेतून उपलब्ध झाली आहे.