नगर परिषदेच्या सर्व्हेक्षणातून स्पष्ट,
राजेश जाधव / चिपळूण
नगर परिषदेने शहरातील पूरबाधित क्षेत्रात केलेल्या सर्व्हेक्षणातून या भागात 1105 कुटुंबे रहात असल्याचे स्पष्ट झाले आहे. यात 1105 वयोवृध्द तसेच 327 लहान मुले आहेत. तसेच 289 जण विविध आजरांनी ग्रस्त असून 19 महिला गरोदर आहेत. तसेच 244 जनावरेही या कुटुंबांकडे आहेत. त्यामुळे या भागावर प्रशासनाची करडी नजर आहे.
अधिक वाचा- Ratnagiri; जाकादेवीत मटका अड्ड्यावर छापा; एकावर गुन्हा दाखल
गतवर्षी आलेला महापूर, यात प्रशासनाची उघड झालेली सतर्कता, त्यातून अधिकाऱ्यांवर नागरिक, लोकप्रतिनिधी यांचा आलेला रोष याचा विचार करता यावर्षी अशी परिस्थिती येऊ नये म्हणून नगर परिषद प्रशासन अधिक सतर्क असल्याचे दिसून येत आहे. यातूनच आपत्ती निवारणाची तयारी अगदी एपिल महिन्यापासून सुरू करण्यात आली होती. आपत्ती काळात एखाद्या भागाला, नागरिकाला आवश्यक ती मदत वेळेत देता यावी यासाठी पूरबाधित भागात सर्व्हेक्षण करण्याचा निर्णय मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांनी घेतला होता. यासाठी 7 पथके तयार करण्यात आली होती. त्यात 20 कर्मचाऱ्यांचा समावेश होता.
या पथकातील कर्मचाऱयांनी घराघरात जाऊन कुटुंबात व्यक्ती किती, गरोदर माता किती, मुले किती, आजारी व्यक्ती किती, वयोवृध्दांची संख्या किती, मागील महापुरात काय नुकसान झाले होते, अचानक पाणी आल्यास तात्पुरती सुरक्षित निवाऱ्याची काय व्यवस्था आहे आदीपकारची माहिती घेतली. त्यानुसार पूरबाधित क्षेत्रात 1105 कुटुंबे रहात असून त्यात 1105 वयोवृध्द, 327 लहान मुले असून 19 महिला गरोदर आहेत. तसेच 289जण आजारी असून 244 जनावरे या कुटुंबांकडे असल्याचे पुढे आले आहे.
या सर्व्हेनुसार बाजारपेठ, खेंड, महालक्ष्मीनगर या पूरबाधित भागात 68 कुटुंबे असून त्यात 27 वयोवृध्द, 16 मुले, 3 गरोदर महिला असून 2 नागरिक आजारी असतात. या भागात मात्र कोणाकडेही जनावरे नाहीत. पेठमाप भागात 158 कुटुंब राहत असून त्या 409 वयोवृध्द आहेत. येथे 61 लहान मुले असून 3 महिला गरोदर आहेत. या भागात सर्वाधिक 233 नागरिक विविध आजरांनी त्रस्त असून याच भागात अधिक म्हणजे तब्बल 122 जनावरे आहेत. गोवळकोटमध्ये 267 कुटुंबांना पुराचा धोका असून येथे 31 वयोवृध्द, 23 लहान मुले वास्तव्यास आहेत. 3 महिला गरोदर असून दोघांनाच आजार आहे. 67 जनावरेही या भागात पाळली जात आहेत. मुरादपूर, शंकरवाडी परिसरात सर्वाधिक 303 कुटुंबे पूरबाधित भागात रहात असून या कुटुंबांमध्ये 298 वयोवृध्द, 156 लहान मुले रहात असून आजाराचे पमाणही कमी आहे. येथे 39 जण आजारी असून 7 महिला गरोदर आहेत. या कुटुंबांकडे 23 जनावरे आहेत.
मार्कंडी भागात 111 कुटुंबे रहात असून त्यात 20 वयोवृध्द, 18 लहान मुले आहेत. येथील 2 महिला गरोदर असून 4 जण आजारी असतात. या भागात फक्त 7 जनावरे आहेत. चिंचनाका, वडनाका, एसटी स्टँन्ड या परिसरात 198 कुटुंबे वास्तव्यास असून त्यात 83 वयोवृध्द, 53 लहान मुलांचा समावेश आहे. 9 नागरिक आजारी असतात, तर 1 महिला गरोदर आहे. या भागात 25 जनावरे असल्याचे या सर्व्हेक्षणात दिसून आले आहे. त्यामुळे या नागरिकांनी आपत्ती काळात आवश्यक ती मदत तातडीने देण्यासाठी योग्य त्या उयाययोजना नगर परिषद प्रशासनाने केल्या आहेत.