आणखी चांगल्या दर्जाची सुविधा रुग्णांना देण्यात येणार : जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांची माहिती : आरोग्य उपसंचालक डॉ. संजोग कदम यांच्या पाठपुराव्याने शहरात सात हेल्थ वेलनेस सेंटर मंजूर, निविदा प्रक्रियेचे काम सुरु
प्रतिनिधी/सातारा
सर्वसामान्य रुग्णांना चांगल्या दर्जाचे उपचार देवून ठणठणीत बरे करण्यामध्ये प्राधान्य राहिले पाहिजे. याकरता राज्य शासनाच्या आरोग्य विभागाकडून जिह्यासाठी साताऱयात प्रथम दर्जाचे शासकीय ट्रामा केअर सेंटर युनिट मंजूर झाले आहे. हे युनिट 50 बेडचे असून त्याकरता राज्य शासनाने सुमारे 13 कोटींचा निधी मंजूर केला आहे, लवकरच या कामाला प्रारंभ होईल अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
दरम्यान, सातारा जिह्यात 31 हेल्थ वलनेस सेंटर सुरु करण्यात येणार आहेत. त्यापैकी सात शहरात होणार आहेत, त्यांच्या बांधकामासाठी निविदा प्रक्रियेचे कामकाज सुरु आहे, अशी माहिती आरोग्य उपसंचालक डॉ. संजोग कदम यांनी तरुण भारतशी बोलताना दिली.
साताऱयात प्रथम दर्जाचे शासकीय ट्रामा केअर सेंटरबाबत बेतलाना जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण म्हणाले, ट्रामा केअर सेंटर सातारा येथील आपल्या क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयात आहे. परंतु त्यामध्ये शासनाच्यावतीने आणखी चांगल्या दर्जाची सेवा देण्याच्या हेतुने प्रथम दर्जाची शासकीय ट्रामा युनिट मंजूर करण्यात आले आहे. हे युनिट 50 बेडचे असणार आहे. त्यामध्ये महामार्गावर अपघात झाल्यास अपघातग्रस्तांना चांगले उपचार तातडीने कसे देता येतील हे याच्या माध्यमातून पाहिले जाणार आहे. सगळय़ा प्रकारच्या सुविधा एका छताखाली रुग्णांना देता येणार आहेत. या युनिटमध्ये न्युरोसर्जन, इंटेसिटीव्ह जनरल सर्जन, आर्थोपेडिक सर्जन, ऍनस्थेस्टिक निवासी वैद्यकीय अधिकारी आणि कुशल परिचारिका असणार आहेत. तसेच शस्त्रक्रिया विभाग आणि अतिदक्षता विभागात अत्याधुनिक उपकरणे असणार आहेत. त्याचबरोबर यासाठी शासनाच्यावतीने सुमारे 13 कोटी रुपयांचा निधीही देण्यात येणार आहे. याचे काम मार्गी लागल्यानंतर आणखी चांगली सुविधा रुग्णाना देता येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
शहरात 7 हेल्थ वेलनेस सेंटर लवकरच सुरु करण्यात येणार
सातारा जिह्यात 31 हेल्थ वेलनेस सेंटर मंजूर झालेली आहेत. त्यापैकी सात ही सातारा शहरात असून ती उभी करण्यासाठी 5 वेलनेस सेंटरकरता जागाही निश्चित झालेली आहे. त्याच्या बांधकामाकरता निविदा प्रक्रियेचे कामकाज सुरु आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला प्रारंभ होईल. सातारा शहरात सात वेलनेस सेंटर लवकरच सुरु होतील. – डॉ. संजोग कदम आरोग्य उपसंचालक