मूर्तीच्या किमती 10 टक्केनी वाढणार : मूर्तीकारांच्याकडे गणेश मंडळांकडून मूर्तीचे बुकींग : पर्यावरण पूरक गणेश मूर्तीवर जास्त भर
प्रतिनिधी/सातारा
कोरोनामुळे गेल्या दोन वर्षात सण उत्सवावर शासनाच्यावतीने निर्बंध होते. यावर्षी शासनाने सर्व निर्बंध हटवले गेले असल्याने यावर्षी सातारा शहरासह जिह्यातील कुंभारवाडय़ात गणेशमूर्ती तयार करण्याच्या कामांची लगबग सुरु आहे. गणेशमूर्तींना रंगकाम करण्याचे काम सुरु आहे. तसेच गौरींचे मुखवटेही तयार करण्यात आलेले असून यावर्षी 10 टक्के दरवाढ होणार आहे, अशी माहिती मूर्तीकार पोपट कुंभार यांनी दिली.
मूर्तीकारांना वर्षातूनच बेंदूर, नागपंचमी, गणेशोत्सव, दुर्गाउत्सव चार सणांवेळीच कामकाज असते. वर्षाचे चार सण मूर्तीकारांसाठी महत्वाचे असतात. दोन वर्ष कोरोनामुळे सर्व मूर्तीकारांच्यापुढे पेच निर्माण झाला होता. कोरोनामुळे दोन वर्षात सण उत्सव साजरे झाले नव्हते. त्याअगोदर पुरामुळे अगदी साधेपणाने उत्सव झाले होते. यावर्षी सरकारने सण उत्सवावरील बंदी उठवली आहे. सण उत्सव धुमधडाक्यात साजरे करण्याचे आदेश दिले गेले आहेत. त्यामुळे साताऱयातील कुंभारवाडय़ातही आनंदाचे उत्साहाचे वातावरण आहे. मूर्तीकारांनी बेंदूर सणांवेळीच बैलांच्या मूर्ती बनवण्यासाठी भांडवल गुंतवले होते. आता येवू घातलेल्या गणेशोत्सवासाठी मूर्ती बनवण्याच्या कामाला वेग आलेला आहे. यंदा पीओपीच्या मूर्तीना मान्यता दिली गेली असल्याने साताऱयातील व्यावसायिकांनी पीओपीच्या काही प्रमाणात मूर्ती तयार केलेल्या असल्या तरीही पर्यारवण पूरक मूर्ती तयार केल्या जात आहेत. दरम्यान, साताऱयातील अनेक गणेश मंडळांकडून मूर्तीकारांकडे मूर्तीचे बुकींग केले असून काही मूर्तीचे काम सुरु करण्यात आले आहे काही मूर्तीचे काम अंतिम टप्यात आले आहे. मूर्तीच्या कारखान्यात रंगकाम करण्याचे काम सुरु आहे. गौरींचे मुखवटेही तयार करण्यात आले आहेत.
यावर्षी मूर्तींच्या किमती 10 टक्केनी वाढणार
यावर्षी कच्च्या मालाच्या किमतीमध्ये 10 टक्केनी वाढल्या आहेत. रंगाच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे यावर्षीच्या मूर्तीच्या किमती 10 टक्केंनी वाढणार आहेत. तसेच गौरींचे मुखवटेही जशी मागणी असेल तसे आम्ही तयार केलेले आहेत. त्यांच्याही किमती वाढलेल्या आहेत. पर्यावरण पूरक गणेश मूर्तीना मागणी आहे.
पोपट कुंभार मूर्तीकार