वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
नवव्या व्हिवो पुरस्कृत प्रो लिग कबड्डी हंगामासाठी स्पर्धा आयोजकांनी 5-6 ऑगस्ट रोजी मुंबईत कबड्डीपटूंचा लिलाव कार्यक्रम आयोजित केला आहे. कबड्डीपटूंच्या लिलावामध्ये प्रामुख्याने बंगाल वॉरियर्स, बेंगळूर बुल्स आणि दबंग दिल्ली या तीन संघांचे प्रँचायझी अव्वल कबड्डीपटूंना खरेदी करण्यासाठी सज्ज झाले आहेत.
या स्पर्धेमध्ये एकूण 12 संघांचा समावेश राहिल. या सर्व संघांचे प्रँचायझी सध्या कबड्डीपटूंच्या लिलाव प्रक्रियेवर जोरदार तयारी करीत आहेत. नवव्या प्रो कबड्डी लिग स्पर्धेसाठी आपला संघ अधिक बलवान बनविण्यासाठी विविध संघांचे प्रँचायझी अव्वल कबड्डीपटूंना खरेदी करण्याकरिता आतुरलेले आहेत. या स्पर्धेत सहभागी होणाऱया काही संघांनी अव्वल कबड्डीपटूंना खरेदी करण्यासाठी अधिक रक्कम बोलीच्या स्वरुपात खर्च करण्याची तयारी केली आहे, अशी माहिती बंगाल वॉरियर्सचे सीईओ संदीप तर्कास यांनी दिली आहे. नवव्या प्रो कबड्डी लिग स्पर्धेसाठी यावेळी कबड्डीपटूंचा लिलाव कार्यक्रम अत्यंत चुरशीचा पहावयास मिळेल, अशी आशा दिल्ली दबंगचे संचालक दुर्गानाथ वागळे यांनी व्यक्त केली आहे. व्हिवो पुरस्कृत प्रो कबड्डी लिग स्पर्धेमुळे देशातील नवोदित कबड्डीपटूंना चांगले व्यासपीठ निर्माण करून दिले आहे. भविष्यकाळामध्ये भारतामध्ये अनेक दर्जेदार कबड्डीपटू या स्पर्धेमुळे निर्माण होऊ शकतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. कबड्डीपटूंच्या लिलावामध्ये 2021 च्या खेलो इंडिया आंतरविद्यापीठ स्पर्धेतील युवा कबड्डीपटूंचा काही संघ विचार करीत आहेत.