पशू तस्करी प्रकरणी कारवाई : ममतांना झटका
वृत्तसंस्था /कोलकाता
पशू तस्करी प्रकरणी सीबीआयने मोठी कारवाई करत तृणमूल काँग्रेसचे नेते अनुव्रत मंडल यांना अटक केली आहे. सीबीआयचे पथक गुरुवारी सकाळी मंडल यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. अनुव्र मंडल यांना झालेली अटक मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासाठी मोठा झटका असल्याचे मानले जातेय. राज्याचे शिक्षण मंत्री राहिलेले पार्थ चॅटर्जी यांना अटक झाल्याने ममता बॅनर्जी यापूर्वीच बॅकफूटवर आहेत. शिक्षक भरती घोटाळय़ात सामील पार्थ चॅटर्जी यांच्या निकटवर्तीय अर्पिता मुखर्जीच्या घरातून 50 कोटी रुपये हस्तगत करण्यात आले होते.
पशू तस्करीप्रकरणी सीबीआयने बजावलेल्या 10 समन्सवर अनुव्रत मंडल यांनी कुठलेच उत्तर दिले नव्हते. यामुळे सीबीआयने न्यायालयात धाव घेतली होती. सीबीआयने यापूर्वी दोनवेळा मंडल यांची चौकशी केली होती. सीबीआयने 2020 मध्ये पशू तस्करीप्रकरणी गुन्हा नोंदविला होता. तसेच मंडल यांचे सुरक्षारक्षक सैगल हुसैनला यापूर्वीच अटक करण्यात आली आहे.