ऑनलाईन टीम/तरुण भारत
‘आता मुख्यमंत्रीही घरी बसणार नाहीत आणि तुम्हालाही घरी बसू देणार नाहीत,’ असा टोला देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) लगावला. तसेच, आशिष शेलार (Ashish Shelar) यांना मुंबई महापालिकेचा २०-२० सामना जिंकायचा असल्याचं म्हणत भाजपासाठी मुंबई महापालिका निवडणुकांचं बिगुल देखील त्यांनी फुंकलं.
दरम्यान, भाजपाने मुंबई महानगरपालिकेत परिवर्तन घडवून आणण्याचा संकल्प घेतला आहे. आपण सर्वांनी कालची मुंबई पाहिली का? तोच उत्साह, तोच जल्लोष, तीच संस्कृती, तीच परंपरा! पुन्हा एकदा आपलं सरकार आल्यानंतर काय घडतं हे आपण सगळ्यांनी बघितलं. काल दहीहंडी जोरात झाली. आता आता गणेशोत्सव, नवारोत्सवसह सर्व सण जोरात करायचे आहे. आता मुख्यमंत्रीही घरी बसणार नाहीत आणि तुम्हालाही घरी बसू देणार नाहीत, असा उपरोधिक टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. ते आज भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते.
मुंबई महापालिकेवर शिवसेना-भाजप युतीचाच भगवा फडकेल. पण कोणती शिवसेना? बाळासाहेबांच्या विचारावर चालणारी आणि शिंदेच्या नेतृत्त्वातील शिवसेना. या शिवसेनेसोबत निवडणूक लढवून भगवा महापालिकेवर लावल्याशिवाय राहणार नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
हे ही वाचा : मिठावर कर लावला, त्यांना घालवलं; आता पिठावर कर लावणारेही जातील – बाळासाहेब थोरात
मुंबई महापालिकेचा २०-२० सामना जिंकायचा
आशिष शेलार तुम्ही क्रिकेट खेळणारेही आहात, जाणणारेही आहात आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्षही आहात. त्यामुळे आता आपल्याला महानगर पालिकेत मुंबई विकास लीग सुरू करायची आहे. मुंबईतील विकास कामे करताना आपल्याला अनेक अडचणी येतील. अडथळे येतील. पण, आशिषजी तुम्ही फुटबॉलची अनेक मैदाने तयार केली आहेत. त्यामुळे अडचणींना किक कशी मारायची हे तुम्हाला माहिती आहे. अनेक उड्या मारणारी लोकं आहेत. दोरी उड्या असोसिएशनचे महाराष्ट्राचे अध्यक्षच आशिष शेलार आहेत. त्यामुळे कोणाला किती उडू द्यायचं आणि दोरी खेचायची ह्याचीही तुम्हाला कल्पना आहे. आशिष शेलार यांनी मागच्या वेळी जो स्ट्राईक रेट दाखवला तो दुप्पटीहून अधिक होता. ३५ वापरून ८२ वर गेलो. आता स्ट्राईक रेट मागच्यापेक्षा जास्त असला पाहिजे, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी आशिष शेलार यांची पाठही थोपटली आणि त्यांना येत्या निवडणुकीसाठी टार्गेटही दिलं.