नामिबियामधून आठ चित्ते रवाना ः पंतप्रधानांच्या उपस्थितीत मध्यप्रदेशमध्ये कार्यक्रम
वृत्तसंस्था/ भोपाळ
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिनी, शनिवारी मध्यप्रदेशातील कुनो राष्ट्रीय अभयारण्यात 8 चित्त्यांना सोडले जाणार आहे. यानिमित्ताने पंतप्रधान शनिवारी सकाळी अभयारण्यात प्रत्यक्ष हजर राहणार आहेत. पंतप्रधान मोदींचा वाढदिवस मध्यप्रदेशात साजरा व्हावा, अशी इच्छा मध्यप्रदेश सरकारने व्यक्त केली होती. त्याला मान देत पंतप्रधान मोदींनी कुनो अभयारण्याची निवड केली असून याच औचित्याने भारतात आणण्यात आलेल्या आफ्रिकन चित्त्यांना अभयारण्यात सोडण्याचा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
पंतप्रधान मोदींच्या हस्ते कुनो अभयारण्यात आफ्रिकेतून आणलेले चित्ते सोडण्यात येणार आहेत. भारतीय भूमीवरचा चित्ता 1940 मध्ये नामशेष झाल्याचे मानण्यात येते. अतिशिकार तसेच चित्ते पाळण्याचा त्यावेळच्या संस्थांनिकांचा षौक यामुळे भारतीय चित्ता नामशेष झाला. आता या नैसर्गिक हानीची उणीव आफ्रिकेतील चित्ते भारतीय वनांमध्ये सोडून भरून काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. कुनो अभयारण्यापासून या प्रकल्पाचा प्रारंभ होत आहे.
नामिबियामधून विशेष विमान
नामिबिया ते मध्यप्रदेशमधील कुनो अभयारण्य असा चित्त्यांचा प्रवास शुक्रवारीच सुरू झाला. नामिबियातील सीसीएफ (चिता संवर्धन निधी) क्षेत्रातून चित्ते विमानतळाकडे रवाना झाल्याची माहिती चित्त्यांच्या स्थलांतराच्या कामात गुंतलेल्या तज्ञांनी दिली. 8 चित्त्यांचे पिंजरे कंटेनरमध्ये ठेवून नामिबियाची राजधानी विंडहोकजवळील विमानतळावर आणण्यात आले. हे कंटेनर विशेष विमानात ठेवल्यानंतर भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता या विमानाने चित्ते भारताकडे रवाना झाले. शनिवारी सकाळी सहा वाजता हे विमान ग्वाल्हेरला पोहोचणार आहे. त्यानंतर शनिवारी सकाळी 7 वाजेपर्यंत चित्ते कुनो अभयारण्यात पोहोचतील, अशी माहिती प्रशासकीय पातळीवरून देण्यात आली.
कुनो नॅशनल पार्कच्या टिकतौली गेटपासून 18 कि.मी. आत पाच हेलिपॅड आहेत. यातील तीन पंतप्रधान आणि त्यांच्या संरक्षणासाठी आलेल्या हेलिकॉप्टरसाठी राखीव आहेत. येथून 500 मीटरच्या परिघात 10 फूट उंचीचे व्यासपीठ तयार करण्यात आले आहे. या मंचावर मोदींशिवाय मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, केंद्रीय वनमंत्री आणि मध्यप्रदेशचे वनमंत्री असतील. या व्यासपीठाशेजारीच सुरक्षित ठिकाणी सहा फुटांच्या पिंजऱयात चित्ते ठेवण्यात येणार असून सदर पिंजरे पंतप्रधानांच्या उपस्थितीत खोलले जाणार आहेत.
चित्त्यांचे आगमन विलक्षण घटना ः शिवराजसिंह चौहान
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी सकाळी 9.40 वाजता ग्वाल्हेर विमानतळावर पोहोचतील. तेथून ते कुनोला रवाना होतील. तयारीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान शुक्रवारी रात्री 8.30 वाजता कुनो येथे दाखल झाले होते. या दौऱयावेळी त्यांनी देशात आणि राज्यात चित्त्यांचे आगमन होणे ही एक विलक्षण घटना असल्याचे म्हटले आहे.
8 चित्त्यांमध्ये 5 मादी, 3 नर
भारतात येणाऱया आठ चित्त्यांमध्ये 5 मादी तर 3 नर जातीचे असल्याची माहिती देण्यात आली. नामिबियातील सीसीएफ अभयारण्य प्राधिकरणाने जारी केलेल्या माहितीनुसार त्यामध्ये दोघे सख्खे भाऊही आहेत. त्यांचे वय अडीच ते साडेपाच वर्षे आहे. चित्त्यांचे सरासरी आयुर्मान साधारणपणे 12 वर्षे असते. नामिबियातील पशुवैद्यकीय तज्ञ आना बुस्टो यांच्या नेतृत्त्वाखालील एक विशेष पथक चित्त्यांच्या भारतापर्यंतच्या सुखरूप प्रवासासाठी कार्यरत आहे.
महिनाभर ठेवणार कटाक्षाने नजर
कुनो-पालपूर राष्ट्रीय उद्यानात पोहोचल्यानंतरच चित्त्यांना अन्न दिले जाणार आहे. कुनो अभयारण्यात सोडल्यानंतर एक-दोन दिवसांत ते शिकार करू शकतात. त्यांच्या या शिकारीसाठी चितळांना सदर क्षेत्रात सोडण्यात आले आहे. तथापि, या आफ्रिकन चित्त्यांनी चितळांची शिकार न केल्यास त्यांना म्हशीचे किंवा बकरीचे मांस दिले जाऊ शकते. पुढील जवळपास एक महिना आठही चित्त्यांवर कटाक्षाने नजर ठेवली जाणार आहे. त्यांच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी विशेष यंत्रणाही सज्ज करण्यात आली आहे.
करारानुसार चित्त्यांचा पुरवठा होणार
आफ्रिकेतील नामिबिया देशातून हे वन्य चित्ते आणण्यात आले आहेत. त्यांची संख्या साधारणतः 40 सांगितली जाते. त्यापैकी 20 चित्ते कुनो अभयारण्यात सोडले जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात आज, शनिवारी आठ चित्त्यांना अभयारण्य अधिवासात सोडले जाणार आहेत. चित्त्यांच्या पुरवठय़ासंबंधी नामिबियाबरोबर दोन वर्षापूर्वीच करार करण्यात आला होता. चार टप्प्यांमध्ये चित्ते सोडले जाणार आहेत. भारतीय वनांमध्ये चित्ते कसा तग धरून राहतात, याचा बारकाईने अभ्यास केला जाणार असून त्यानुसार भविष्यकाळात चित्त्यांची संख्या निर्धारित केली जाणार आहे.