प्रेमविवाहाला विरोध झाल्यामुळे कृत्य; गिरोली घाटातील घटना; तरूण लिंगनूर कापशीचा तर तरूणी खोतवाडीची; तरूणाचा उपचारादरम्यान पहाटे मृत्यु
वारणानगर / इचलकरंजी / प्रतिनिधी
गिरोली घाटातील पांडवलेणी परिसरात प्रेम प्रकरणातून तरुणाने एका महाविद्यालयीन युवतीचा गळा आवळून खून केला. ऋतुजा प्रकाश चोपडे (वय 21, रा. खोतवाडी इचलकरंजी ) असे मृत तरुणीचे नाव आहे. खूनानंतर संशयीत आरोपी कैलास आनंदा पाटील ( रा. लिंगनूर, ता. कागल ) या तरुणाने विषारी औषध प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याला उपचारासाठी कोल्हापुरातील सीपीआर हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता त्याचा उपचारदरम्यान मृत्यु झाला. ही घटना मंगळवार रात्री सातच्या सुमारास घडली असून, यांची माहिती समजताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी धाव घेतली. याची कोडोली पोलिसात रात्री उशिरा नोंद झाली आहे.
घटनास्थळ आणि पोलिसांच्याकडून मिळालेली माहिती अशी, मृत ऋतुजा चोपडे ही पेठवडगाव ( ता. हातकणगंले) येथील एका महाविद्यालयात डी फार्मसीचे शिक्षण घेत होती. याच वेळी तिची संशयीत आरोपी कैलास पाटील यांच्या बरोबर ओळख झाली. यातून त्याच्या मध्ये नाजूक संबध निर्माण झाले. मंगळवारी सकाळी ऋतुजा महाविद्यालयाला जातो असे सांगून घरातून निघून गेली. याच दरम्यान मृत ऋतुजा आणि संशयीत आरोपी पाटील यांची भेट झाली. हे प्रेमी युगल फिरण्यासाठी म्हणून गिरोली येथील पांडव लेणी परिसरात आले होते. यावेळी या दोघात शाब्दीक वाद झाला. या वादातून प्रियकर पाटीलने प्रियेसी ऋतुजाचा गळा आवळून खून केला. खूनानंतर संशयीत आरोपी पाटीलने आत्महत्या करण्यासाठी विषारी औषध प्राशन केले. ही घटना काही नागरिकाच्या निदर्शनास आली. त्यांनी यांची माहिती पोहाळे गावचे पोलीस पाटील यांना दिली. त्यांनी ती माहिती कोडोली पोलिसांना देताच अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, शाहूवाडीचे पोलीस उपाधीक्षक रवींद्र साळुंखे, कोडोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शितल कुमार आदी वरिष्ठ पोलीस अधिकारी त्वरीत घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घडल्या घटनेची माहिती घेतली. खूनानंतर विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या करणारा संशयीत आरोपी पाटीलला उपचारासाठी कोल्हापुरातील सीपीआर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात पोलीस बंदोबस्तात उपचार सुरु होते. पण पहाटे त्याचा मृत्यु झाला. मृत ऋतुजा ही एकुलती मुलगी आहे. एकुलत्या मुलगीचा खून झाल्याची माहिती समजताच तिच्या आई वडिलाना मोठा मानसिक धक्का बसला आहे.
कैलासची प्रकृती अत्यवस्थ
घटनेनंतर सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास कैलास पाटील याला उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले होते. त्याच्यासोबत नातेवाईकही होते. पोलिसांकडून त्याला घटनेबद्दल माहिती विचारण्यात येते होती. पण, तो बोलण्याच्या अवस्थेत नसल्याने प्रतिसाद देत नव्हता. अत्यवस्थतेमुळे त्याच्यावर उपचार सुरु होते. शिक्षण बारावी त्याच्या पक्षात आई वडील तीन विवाहित बहिणी असा परिवार आहे.
सकाळी गुडबाय, सायंकाळी एंड
कैलास एका खासगी सिमेंट कंपनीत सेल्समन म्हणून काम करतो. तो नात्याने तिचा मावस मामा लागत होता. सकाळी तो कार घेऊन गेला होता. त्याने सकाळी गुडबाय असा मोबाईलवर स्टेटस ठेवला होता. तर सांयकाळी घटनेनंतर द-एंड असा स्टेटस ठेवला, होता अशी माहिती त्याच्या निकटवर्तीयांनी दिली.