बार्शी पोलिसांची कारवाई, एक जण ताब्यात, चौघे पसार
प्रतिनिधी/मिरज
मिरजेतून चोरीला गेलेली 35 लाख रुपयांची विदेशी दारू बार्शी पोलिसांनी पकडली आहे. टेम्पो चालकाच्या मोबाईल लोकेशनवरून अवघ्या 24 तासात चोरी प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी रामा शंकर काळे (रा कनेरवाडी, उस्मानाबाद) याला ताब्यात घेण्यात आली असून अन्य चौघे जण पसार झाले आहेत. सदर संशयीत आरोपीसह मुद्देमाल ताब्यात घेण्यासाठी महात्मा गांधी चौकी पोलीस बार्शी पोलीस ठाण्याकडे रवाना झाले असल्याची माहिती तपास अधिकारी राजू अन्नछत्रे यांनी दिली आहे.
गोविंदराव मराठे औद्योगिक वसाहत येथे रवा मैदा कारखान्यासमोर फ्लॉट नं. 96 व 97 मध्ये एम्पायर स्पिरीट इंडीया नावाचे विदेशी दारुचे गोडावून फोडून सिग्राम कंपनीच्या विस्की दारुचे 348 बॉक्स असा 35 लाख, 741 रुपयांचा दारुसाठा चोरुन नेला होता. याप्रकरणी गोडावून व्यवस्थापक विजय किसन निकम (वय 44, रा. अभिमान ऍसेट, विश्रामबाग) यांनी महात्मा गांधी चौकी पोलिसात फिर्याद दिली होती. गांधी चौकी पोलीस या प्रकरणाचा तपास करीत होते.
हे ही वाचा : मिरजेत गोडाऊन फोडून ३५ लाखांची विदेशी दारु लंपास
शुक्रवारी 11 वाजता बार्शी पोलिसांनी दारूचे बॉक्स वाहतूक करणारा टेम्पो पकडला. या टेम्पोत पाच तरुण होते. यातील चौघेजण पोलिसांना बघून पळून गेले. याप्रकरणी पोलिसांनी रामा काळे नामक तरुणाला ताब्यात घेतले. टेम्पो आणि दारू जप्त करण्यात आली असून महात्मा गांधी चौकी पोलिसांना माहिती देण्यात आली आहे. गांधी चौक पोलिसांचे पथक बार्शी पोलीस ठाण्याकडे रवाना झाले असून तेथे जप्त केलेला दारू साठा आणि संशयित आरोपीला ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. पोलिसांच्या सतर्कतेमुळे 24 तासात चोरीच्या गुह्याची उकल झाल्याने पोलिस प्रशासनाचे कौतुक होत आहे.