वृत्तसंस्था/ मनामा (बहरीन)
येथे सुरू असलेल्या 2022 च्या आशियाई महिलांच्या वेटलिफ्टिंग स्पर्धेत भारताची महिला वेटलिफ्टर हर्षदा गरुडने 45 किलो वजन गटात कांस्यपदक पटकावले.
शनिवारी या स्पर्धेत महिलांच्या 45 किलो वजन गटात हर्षदा गरुडने स्नॅचमध्ये 68 किलो तर क्लिन आणि जर्कमध्ये 84 असे एकूण 152 किलो वजन उचलत कांस्यपदक पटकाविले. वरिष्ठांच्या वेटलिफ्टिंग स्पर्धेत हर्षदा गरुडचे हे पहिलेच पदक आहे. 18 वर्षीय हर्षदा गरुडने या वजन गटात फिलिपिन्सच्या रोज रॅमोसशी एकूण वजन उचलण्यामध्ये (152 किलो) बरोबरी साधली पण स्नॅचमध्ये हर्षदाने रॅमोसपेक्षा अधिक वजन उचलल्याने तिला कांस्यपदकासाठी पात्र ठरविले गेले. या वजन गटामध्ये व्हिएतनामच्या खाँग फुआँगने एकूण 166 किलो वजन उचलत सुवर्णपदक तर इंडोनेशियाच्या एस. नफिसेतूल हेरीरोहने 162 किलो वजन उचलत रौप्यपदक पटकाविले. गेल्या जुलै महिन्यात झालेल्या आशियाई युवा आणि कनिष्ठांच्या वेटलिफ्टिंग स्पर्धेत हर्षदा गरुडने 157 किलो वजन उचलत सुवर्णपदक मिळविले होते. या स्पर्धेत भारताची ऑलिम्पिक पदक विजेती महिला वेटलिफ्टर मिराबाई चानू सहभागी झालेली नाही. बहरीनमधील ही स्पर्धा 16 ऑक्टोबरला संपणार आहे.