जिल्हा प्रमुख संजय पवार यांचा घणाघात; उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक महाराष्ट्रातील घराघरांत मशाल चिन्ह पोहचवतील
कोल्हापूर प्रतिनिधी
धनुष्यबाण चिन्ह गोठविल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला केंद्रीय निवडणूक आयोगाने सोमवारी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) असे नाव आणि मशाल हे निवडणूक चिन्ह दिल्याचे जाहीर केले. त्यानंतर शिवसैनिकांतून नवा उत्साह पाहण्यास मिळत आहे. कोल्हापूर जिल्हा शिवसेना प्रमुख संजय पवार यांनी तर प्रतिक्रिया देताना शिंदे गटासह भाजपवर हल्लाबोल केला आहे. मशाल हे क्रांतीचे प्रतीक आहे. हीच मशाल आगामी काळात विरोधकांचा नाश केल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दात संजय पवार यांनी निशाणा साधला आहे.
‘तरुण भारत’ला प्रतिक्रिया देताना संजय पवार म्हणाले, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला पक्षाचे नाव आणि चिन्ह सूचविले होते. त्यानुसार कार्यवाही केल्याबद्दल निवडणूक आयोगाच्या निर्णयाचे स्वागत आहे. आता नाव आणि चिन्ह मिळाल्यानंतर राज्यातील आम्हा लाखो शिवसैनिकांची जबाबदारी वाढली आहे. पक्षाच्या नावातच पक्षप्रमुख उद्धव साहेब आहेत. हिंदूहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब आहेत आणि ठाकरे आडनावही आहे. शिवतीर्थावर दसरा मेळाव्यात उद्धवसाहेबांनी मी कुणीच नाही. मात्र उद्धव बाळासाहेब ठाकरे नाव असेल तरच त्याला महत्व आहे. कोटय़वधी जनता या नावावर प्रेम करते. त्यांच्या भावनांनुसार शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) असे नाव लाभले आहे. प्रत्येक शिवसैनिक आणि शिवसेनेची विचारधारा मानणाऱया शिवसेनाप्रेमींच्या हृदयात धनुष्यबाण चिन्ह आहे. ते गोठविण्याचे पाप शिंदे गटाने केले आहे. हे महाराष्ट्रातील जनता कधीही सहन करणार नाही. आगामी निवडणुकांत नवीन मिळालेले नाव आणि मशाल चिन्ह घेऊन उद्धवसाहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना उतरणार आहे. मशाल चिन्ह महाराष्ट्रातील प्रत्येक घरात पोहचविण्यासाठी आम्ही लाखो शिवसैनिक जीवाचे रान करू. शिवसेनेच्या धगधगत्या मशालीच्या तेज आणि ज्वाळांमध्ये विरोधकांचा नाश होईल, अशा शब्दात संजय पवार यांनी आपल्या भावना मांडल्या.
छत्रपती शिवाजी महाराज चौकात आज मशाली पेटविणार !
शहर आणि जिल्हा शिवसेनेच्या (शिवसेना : उद्धव बाळासाहेब ठाकरे) वतीने आज मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात मशाली पेटवून नव्या क्रांतीचा एल्गार करण्यात येणार आहे. यावेळी शिवसैनिकांसह शिवसेनाप्रेमींनी उपस्थित राहावे, असे आवाहनही संजय पवार यांनी केले.
क्रांती काय असते ते शिवसेनेची मशाल दाखवून देईल : रविकिरण इंगवले
शिवसेना शहर प्रमुख (शिवसेना : उद्धव बाळासाहेब ठाकरे) रविकिरण इंगवले प्रतिक्रिया देताना म्हणाले, क्रांतीज्योत असणारी मशाल क्रांती काय असते ते महाराष्ट्र आणि देशाला दाखवून देईल. कष्टातून वाढलेले प्रादेशिक पक्ष नष्ट करण्याची भाजपसारख्या पक्षांनी अवलंबलेली नीती मशालीची क्रांती यशस्वी होऊ देणार नाही. या क्रांतीची सुरूवात महाराष्ट्रातून उद्धवसाहेबांच्या नेतृत्वाखाली सुरू होणार आहे.