वृत्तसंस्था/ कोलकाता
बीसीसीआयचे माजी अध्यक्ष तसेच माजी कर्णधार सौरव गांगुलीचे रविवारी येथील इडन गार्डन्स मैदानावर आगमन झाले. बंगाल क्रिकेट संघटनेच्या होणाऱया अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी गांगुलीने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. भारतीय क्रिकेट मंडळाच्या अध्यक्षपदाची मुदत संपुष्टात आल्याने गांगुलीने पुन्हा दुसऱयांदा ही निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला होता. आता माजी क्रिकेटपटू कर्नाटकाचे रॉजर बिन्नी यांची भारतीय क्रिकेट मंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. त्याचप्रमाणे आयपीएलच्या चेअरमनपदाची ऑफर गांगुलीला देण्यात आली होती पण त्याने ती नाकारली. गांगुली 2015 ते 2019 या कालावधीत बंगाल क्रिकेट संघटनेचे अध्यक्षपदी होते. आता ते दुसऱयांदा अध्यक्षपदासाठी इच्छूक आहेत. सौरव गांगुलीने यापूर्वी तीन वर्षांच्या कालावधीसाठी बीसीसीआयचे अध्यक्षपद भूषविले होते. बीसीसीआयच्या झालेल्या निवडणुकीनंतर जय शहा हे सचिवपदी तर आशिष शेलार खजिनदारपदी त्याचप्रमाणे राजीव शुक्ला उपाध्यक्षपदी आहेत. देवजित साकिया हे संयुक्त सचिव असून अरुण धुमाळ आयपीएलचे चेअरमन आहेत.