अनेकदा वाचनालयातून आणलेले पुस्तक परत करायचे विसरुन जाते. ते पुस्तक घरातच पडून राहते. प्रत्येक वेळी हे हेतुपुरस्सर केले जाते असे नाही. तथापि, याचा परिणाम असा होतो की हे पुस्तक ज्यांना वाचायचे असते त्यांना ते मिळत नाही. वाचनालयाचे संचालकही कित्येकदा पुस्तके परत घेण्यामध्ये म्हणावी तशी तप्तरता दाखवत नाहीत. त्यामुळे कित्येकदा महत्वाची पुस्तकेही गायब होतात.
पण आजोबांनी वाचनालयातून नेलेले पुस्तक तीन पिढय़ांनंतर नातवाने परत करण्याची घटना अनोखीच मानावी लागणार आहे. ही घटना ब्रिटनमध्ये घडली आहे. दिवंगत कॅप्टन विल्यम हंफ्रीज यांनी एक पुस्तक अर्ल्सडन वाचनालयातून 1939 मध्ये घरी वाचण्यासाठी नेले. ते त्यांनी परत दिलेच नाही. वास्तविक पुस्तकाच्या कार्डावर परतीचा दिनांक 11 ऑक्टोबर 1938 असा होता. तथापि, हंफ्रीज यांच्या घरीच ते तब्बल 84 वर्षे पडून राहिले. अखेर त्यांचे नातू पॅडी रिओर्डन यांच्या लक्षात ही बाब आली. त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे हे पुस्तक वाचनालयाला परत दिले. त्यांना पुस्तक उशीरा परत केल्यामुळे 18.27 पौंड, अर्थात साधारणतः 1,740 रुपये दंड करण्यात आला. तो त्यांनी भरला आणि पुस्तक परत दिले. हे पुस्तक त्यांना त्यांच्या जुन्या घराची साफसफाई करताना हाती लागले होते. पण लक्षात आल्यानंतर त्वरित त्यांनी ते मोठय़ा मनाने परत केले. रेड डिअर असे या पुस्तकाचे नाव असून ते रिचर्ड जेफरीज यांनी लिहिले आहे. वाचनालयाच्या नियमानुसार जर दंड आकारला केला असता तर तो 7 लाख 33 हजार रुपये इतका बसला असता. मात्र, चूक नातवाची नव्हती. त्यामुळे त्यांच्याकडून केवळ औपचारिक रक्कम दंड म्हणून घेण्यात आली होती. महत्वाचा मुद्दा असा की असा प्रामाणिकपणा सध्याच्या काळात दुर्मिळच म्हणावा लागेल.