मोठय़ा क्षेत्रात सोडल्यानंतर चितळाला केले फस्त ः व्यवस्थापनाची माहिती
कुनो / वृत्तसंस्था
मध्यप्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये मोठय़ा बंदिस्तात सोडल्यानंतर प्रथमच आफ्रिकन चित्त्यांनी स्वतः शिकार केली. दोन्ही चित्त्यांनी तब्बल 48 तासांनंतर एका चितळाची शिकार केल्याचे कुनो नॅशनल पार्क व्यवस्थापनाने सोमवारी सांगितले. तसेच दोन्ही चित्ते निरोगी असल्याचे डीएफओ प्रकाश वर्मा यांनी सांगितले. मोठय़ा क्षेत्रात सोडण्यात आलेल्या चित्त्यांवर सतत कॉलर आयडी, सीसीटीव्ही आणि ट्रप कॅमेऱयांद्वारे लक्ष ठेवले जात आहे.
17 सप्टेंबर रोजी आफ्रिकेतील नामिबियातून कुनो नॅशनल पार्कमध्ये 8 चित्ते आणण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते वाढदिवसाचे औचित्त्य साधून हे चित्ते सोडल्यानंतर त्यांना अलग ठेवण्यात आले होते. सुमारे 50 दिवसांनंतर शनिवारी दोन नर चित्त्यांना एका मोठय़ा आवारात सोडण्यात आले. दोन चित्त्यांना मोठय़ा एन्क्लोजरमध्ये सोडण्यापूर्वी चित्ता टास्क फोर्सची बैठक झाली. टास्क फोर्सच्या सदस्यांच्या संमतीनंतर चित्त्यांना ‘क्वारंटाईन’मधून सोडण्यात आले.
प्रदीर्घ कालावधीनंतर भारतात आणलेल्या चित्त्यांनी प्रथमच शिकार केली आहे. आता ते स्वतः आपल्या आवडत्या प्राण्याची शिकार करून पोट भरू शकतील असे संकेत मिळत असल्याचे डीएफओ प्रकाश वर्मा यांनी सांगितले. इतर सहा चित्त्यांना मोठय़ा क्षेत्रात सोडण्याचा निर्णय टास्क फोर्स घेणार आहे. आमची तयारी पूर्ण झाली असून वरिष्ठांनी निर्देश दिल्यानंतर अन्य चित्त्यांना क्षेत्र वाढवून दिले जाणार असल्याचे ते पुढे म्हणाले. 6 चित्ते अजूनही क्वारंटाईन क्षेत्रात आहेत.
शिकारीसाठी प्राण्यांची व्यवस्था
मोठय़ा आवारात फक्त नर चित्ते सोडण्यात आले आहेत. तेथे हरिण, चितळ यांसारखे छोटे प्राणी त्यांच्या शिकारीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. विदेशातून चित्त्यांना भारतात आणण्यापूर्वी 30 दिवस नामिबियामध्ये अलग ठेवण्यात आले होते. त्यानंतर ते भारतात 50 दिवस क्वारंटाईन होते. अशाप्रकारे 80 दिवसांनंतर त्यांना एका मोठय़ा बंदोबस्तात शिकार करण्याची संधी मिळाली आहे.