विधानसभेच्या 68 जागांसाठी 413 उमेदवार रिंगणात
सिमला / वृत्तसंस्था
हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी आज शनिवारी मतदान होत आहे. या मतदानाची तयारी केंद्रीय निवडणूक आयोगाने पूर्ण केली असून मतदान शांततेत पार पडावे यासाठी सुरक्षा व्यवस्थाही चोख ठेवण्यात येणार आहे. हिमाचल प्रदेशात विधानसभेच्या 68 जागांसाठी एकंदर 413 उमेदवार आपले राजकीय भवितव्य आजमावत आहेत.
मतदानासाठी निवडणूक आयोगाने राज्याच्या कानाकोपऱयात 7,881 केंद्रांची व्यवस्था केली आहे. सर्व मतदारकेंद्रांवर अधिकारी पाठविण्याची प्रक्रिया शुक्रवारी सायंकाळपर्यंत पूर्ण करण्यात आली होती. या निवडणूक अधिकाऱयांना सुरक्षेसह सर्व अत्यावश्यक सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. तसेच मतदान प्रक्रियेविषयी इत्यंभूत माहितीही सर्वांना देण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने मतदार सूचींना अंतिम रुप दिले असून त्यांना प्रसिद्धीही दिली आहे. संपूर्ण मतदार सूची इंटरनेटवर उपलब्ध असून मतदान केंद्रांचीही माहिती मतदारांच्या सोयीसाठी देण्यात आली आहे.
राज्यात एकंदर 55 लाख 7 हजार 261 मतदार असून प्रथम मतदान करणाऱयांची संख्या 69,781 इतकी आहे. मतदारांमध्ये 27,80,208 पुरुष आणि 27,27,016 महिला मतदार आहेत. युवा मतदारांची टक्केवारी 75 टक्के इतकी आहे. दिव्यांग मतदारांची संख्या 56,001 इतकी असून त्यांच्या संख्येत 1,470 ची वाढ झाली आहे. राज्यातील मतदारांमध्ये पुरुषांच्या प्रमाणात महिलांचा अनुपात वाढला आहे. मागच्या निवडणुकीत प्रतिहजार पुरुष मतदारांमागे 978 महिला मतदार होत्या. आता ही संख्या वाढून 981 झाली आहे.
सुरक्षा बंदोबस्तही सज्ज
मतदान शांततेत पार पडावे म्हणून सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली असून पोलिसांबरोबरच एनडीआरएफ आणि एसडीआरएफ दलाच्या जवानांनाही नियुक्त करण्यात आले आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर पुरेसे सुरक्षा सैनिक नियुक्त आहेत. नैसर्गिक आपत्तींचे निवारण करता यावे यासाठी या दलांचे 50 रक्षक लाहौल-स्फितीमध्ये नियुक्त करण्यात आले आहेत. तसेच चंबा आणि पांगी येथेही आपत्तीनिवारण कर्मचारी नियुक्त करण्यात आल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी मनीष गर्ग यांनी दिली.