डेविड मलानचे दणकेबाज शतक वाया, इंग्लंड सहा गडय़ांनी पराभूत
वृत्तसंस्था/ ऍडलेड
तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत यजमान ऑस्ट्रेलियाने आपल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर पहिल्या सामन्यात इंग्लंडचा सहा गडय़ांनी पराभूत करत विजयी सलामी दिली. इंग्लंडच्या डेविड मलानने नोंदवलेले शतक वाया गेले. या सामन्यात ऑस्ट्रेलियातर्फे डेविड वॉर्नर, ट्रेविस हेड आणि स्टीव्ह स्मिथ यांनी शानदार अर्धशतके झळकविली.
या पहिल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने 9 बाद 287 धावा जमवित ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 288 धावांचे आव्हान दिले. ऑस्ट्रेलियाने 46.5 षटकात 4 बाद 291 धावा जमवित हा सामना 19 चेंडू बाकी ठेऊन सहा गडय़ांनी जिंकला.
इंग्लंडच्या डावामध्ये डेविड मलानने शानदार शतक झळकविताना 128 चेंडूत 4 षटकार आणि 12 चौकारासह 134 धावा झोडपल्या. ऑस्ट्रेलियाच्या अचूक गोलंदाजीसमोर मलान वगळता इंग्लंडच्या इतर फलंदाजांना 40 धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. डेविड विलीने 40 चेंडूत 3 चौकारासह नाबाद 34, कर्णधार बटलरने 34 चेंडूत 2 चौकारासह 29, बिलिंग्जने 2 चौकारासह 17, सॉल्टने 3 चौकारासह 14, जॉर्डनने 14, डॉसनने 11 धावा आणि वूडने 1 चौकारासह 10 धावा केल्या. शतकवीर डेविड मलान 8 गडय़ाच्या रुपात बाद झाला. इंग्लंडच्या डावात 4 षटकार आणि 23 चौकार नोंदविले गेले. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 62 धावात 3 गडी बाद केले. फिरकी गोलंदाज ऍडॅम झम्पाची कमिन्सला चांगली साथ मिळाली. झम्पाने 55 धावात 3 तर स्टार्क आणि स्टोनिस यांनी प्रत्येकी एक बळी मिळविला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना ऑस्ट्रेलियाच्या डावाला वॉर्नर आणि हेड यांनी भक्कम सुरुवात करताना 19.4 षटकात 147 धावांची शतकी भागीदारी केली. इंग्लंडच्या जॉर्डनने हेडला झेलबाद केले. त्याने 57 चेंडूत 1 षटकार आणि 10 चौकारासह 69 धावा जमविल्या. हेड बाद झाल्यानंतर वॉर्नर आणि स्मिथ या जोडीने दुसऱया गडय़ासाठी 53 धावांची भर घातली. विलीने वॉर्नरला झेलबाद केले. त्याने 84 चेंडूत 1 षटकार आणि 10 चौकारासह 86 धावा झळकविल्या. मार्पूस लाबुशिंगे केवळ 4 धावावर बाद झाला. कॅरेने 28 चेंडूत 3 चौकारासह 21 धावा जमविल्या. 39 षटकाअखेर ऑस्ट्रेलियाने 4 बाद 244 धावा जमविल्या होत्या. ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 11 षटकात 44 धावांची जरुरी होती. स्मिथ आणि कॅमेरुन ग्रीन यांनी पाचव्या गडय़ासाठी अभेद्य 45 धावांची भागीदारी करत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. ऑस्ट्रेलियाचे द्विशतक 29 षटकात फलकावर लागले. स्मिथने 78 चेंडूत 1 षटकार आणि 9 चौकारासह नाबाद 80 तर ग्रीनने 28 चेंडूत 3 चौकारासह नाबाद 20 धावा जमविल्या. ऑस्ट्रेलियाच्या डावात 3 षटकार आणि 35 चौकार नोंदवले गेले. इंग्लंडतफे डेविड विलीने 2 तर जॉर्डन आणि डॉसन यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक ः इंग्लंड 50 षटकात 9 बाद 287 (डेविड मलान 134, विली नाबाद 34, बटलर 29, बिलिंग्ज 17, जॉर्डन 14, सॉल्ट 14, वूड 10, कमिन्स 3-62, झम्पा 3-55, स्टार्क 1-45, स्टोनिस 1-23), ऑस्ट्रेलिया 46.5 षटकात 4 बाद 291 (वॉर्नर 86, हेड 69, स्टीव्ह स्मिथ नाबाद 80, लाबुसिंगे 4, कॅरे 21, ग्रीन नाबाद 20, विली 2-51, जॉर्डन 1-49, डॉसन 1-65).