केरळच्या मुख्यमंत्र्यांचे माजी सचिव ः परवडणाऱया घरांच्या योजनेचे शिल्पकार
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
डॉ. सी.व्ही. आनंद बोस यांना पश्चिम बंगालच्या राज्यपालपदी नियुक्त करण्यात आले आहे. राष्ट्रपतींचे माध्यम सचिव अजय कुमार सिंह यांनी बोस यांच्या नियुक्तीसंबंधीचा आदेश जारी केला आहे. डॉ. बोस 1997 च्या तुकडीचे आयएएस अधिकारी तसेच मोदी सरकारसाठी विकासाचा अजेंडा तयार करणाऱया गटाचे अध्यक्ष राहिले आहेत. केंद्र सरकारच्या परवडणाऱया घरांची योजना त्यांनीच सादर केली होती. यापूर्वी जगदीप धनखड हे पश्चिम बंगालचे राज्यपाल होते. जुलै महिन्यात त्यांनी उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढविण्यासाठी राज्यपालपद सोडले होते. धनखड हे निवडणुकीत विजयी होत उपराष्ट्रपती झाले आहेत.
जगदीप धनखड हे सुमारे 3 वर्षांपर्यंत पश्चिम बंगालचे राज्यपाल होते. धनखड यांनी अनेकवेळा राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवरून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सरकारला लक्ष्य केले होते. धनखड यांनी पद सोडल्यावर मणिपूरचे राज्यपाल एल.ए. गणेशन यांच्याकडे पश्चिम बंगालचा अतिरिक्त प्रभार देण्यात आला होता. नव्या नियुक्तीसह आता गणेशन या प्रभारातून मुक्त होणार आहेत.
77 वर्षीय डॉक्टर बोस 1977 च्या तुकडीचे निवृत्त आयएएस अधिकारी आहेत. केरळच्या मुख्यमंत्र्यांचे सचिव आणि शिक्षण, वन-पर्यावरण, कामगार, सामान्य प्रशासन तसेच महसुल मंडळ यासारख्या विविध मंत्रालयांमध्ये त्यांनी मुख्य सचिव म्हणून काम केले आहे.
डॉक्टर बोस एक उत्तम लेखक आणि स्तंभलेखक आहेत. त्यांनी कादंबरी, लघूकथा, कविता आणि निबंधांसह इंग्रजी, मल्याळी आणि हिंदीत 40 पुस्तके लिहिली आहेत. त्यांची काही पुस्तके ही बेल्ट सेलर ठरली आहेत. डॉ. बोस यांना अनेक क्षेत्रांमधील योगदानासाठी 29 आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पुरस्कारही मिळाले आहेत.
गृहबांधणी क्षेत्रातील त्यांच्या प्रयत्नांकरता संयुक्त राष्ट्रसंघाने त्यांच्या पुढाकाराची चारवेळा ‘ग्लोबल बेस्ट प्रॅक्टिस’च्या स्वरुपात निवड केली होती. लोकांना किफायतशीर घरे उपलब्ध करण्यासाठीच्या त्यांच्या कलपनेला सरकारने अंमलात आणले होते.