ऑनलाईन टीम / तरुण भारत :
दिल्लीच्या श्रद्धा वालकर (Shraddha Walkar) हत्या प्रकरणाच्या तपासात आणखी एक मोठा खुलासा करण्यात आला आहे. आरोपी आफताब पुनावालाने (Aftab Poonawala) 18 मे रोजी दिल्लीत श्रद्धाची हत्या केली. त्यानंतर तीन आठवडय़ांनी त्याने वसईमधील घरातून 37 बॉक्समधून काही वस्तू दिल्लीला मागवल्या होत्या. त्यासाठी त्याने गुडलक पॅकर्स अँड मूव्हर्स कंपनीला 20 हजार रुपये दिले होते. वसईमधून हे सामान मुंबईला आणण्याचा खर्च कोण करणार यावरुन श्रद्धा आणि आफताबमध्ये कडाक्याचं भांडण झालं होतं, हे आता पोलीस तपासात समोर आलं आहे.
या प्रकरणाच्या तपासासाठी दिल्ली पोलिसांचं पथक मुंबईत दाखल झालं आहे. त्यांनी संबंधित पॅकेजिंग कंपनीच्या एका कर्मचाऱ्याचा जबाब नोंदवल्यानंतर असे आढळून आले की, आफताब पूनावाला यांने वसईतील एव्हरशाईन सिटीतील व्हाईट हिल्स सोसायटीतील आपल्या फ्लॅटमधून 37 बॉक्समध्ये काही वस्तू जूनमध्ये दिल्लीच्या छतरपूर भागातील राहत्या घरी मागवल्या होत्या. या बॉक्समध्ये घरसमान आणि वॉशिंग मशिन असल्याचे संबंधित कंपनीच्या कर्मचाऱ्याने जबाबत म्हटले आहे.
अधिक वाचा : ठाकरे सत्तेसाठी हिंदुत्व सोडून काँग्रेस धार्जिणे झाले : बावनकुळे
दिल्ली पोलिसांचे पथक वसईतील माणिकपूर येथे आहे, जे श्रद्धा वालकरचे मूळ गाव आहे. जिथे आफताब आणि श्रद्धा दिल्लीला जाण्यापूर्वी वास्तव्यास होते. पोलिसांनी 2021 मध्ये श्रद्धा आणि आफताब ज्या घरात राहिले होते, त्या घराच्या मालकाचा जबाबही नोंदवला आहे. पंधरा दिवसांपूर्वी आरोपीचे कुटुंबीय राहत असलेल्या मुंबईच्या मीरा रोड परिसरातील फ्लॅट मालकाचाही जबाब पोलिसांनी नोंदवला होता.
दरम्यान, दिल्ली पोलिसांचे अधिकारी महरौलीत श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. रविवारी जंगलात त्यांना कवटीचे काही भाग, जबडा व काही हाडे आढळली. पण हा जबडा श्रद्धाचाच आहे किंवा नाही हे अद्याप स्पष्ट झाले नाही.