100 उमेदवारांवर हत्या-बलात्काराचे गंभीर गुन्हे
गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी 1 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात 89 जागांवर निवडणूक लढविणाऱया एकूण 788 उमेदवारांपैकी 167 उमेदवारांवर गुन्हे नोंद आहेत. धक्कादायक बाब म्हणजे आम आदमी पक्षाच्या उमेदवारांवरच सर्वाधिक गुन्हे नोंद आहेत. असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्सकडून यासंबंधी अहवाल जारी करण्यात आला आहे. आम आदमी पक्षाचे 32 उमेदवार गुन्हेगारी पार्श्वभूमीवर आहेत. तर याप्रकरणी काँग्रेस दुसऱया तर भाजप तिसऱया स्थानावर आहे.
गुन्हे नोंद असणाऱया 167 उमेदवारांपैकी 100 जणांवर हत्या किंवा बलात्कारासारखे गंभीर गुन्हे नोंद आहेत. याचबरोबर एकूण उमेदवारांपैकी 21 टक्के जणांवर गुन्हे आहेत. तर 13 टक्के उमेदवारांच्या विरोधात गंभीर आरोप आहेत. आम आदमी पक्ष पहिल्या टप्प्यातील 89 जागांपैकी 88 जागांवर निवडणूक लढवत आहे. आम आदमी पक्षाच्या 36 टक्के उमेदवारांवर गुन्हे नोंद आहेत.
अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील पक्षाचे 30 टक्के उमेदवार हत्या, बलात्कार, हल्ला, अपहरण यासारख्या गंभीर गुन्हय़ांच्या खटल्यांना सामोरे जात आहेत. आपच्या 32 उमेदवारांची गुन्हय़ांची पार्श्वभूमी आहे. आम आदमी पक्ष राज्यात स्वच्छ अन् भ्रष्टाचारमुक्त सरकार देण्याचे आश्वासन देत प्रचार करत असताना ही आकडेवारी समोर आली आहे.
‘आप’नंतर सर्वाधिक गुन्हे नोंद असणारे उमेदवार काँग्रेसचे आहेत. काँग्रेसच्या 35 टक्के उमेदवारांच्या विरोधात गुन्हे नोंद आहेत. तर 20 टक्के उमेदवारांवर गंभीर गुन्हे आहेत. काँगेस पक्ष पहिल्या टप्प्यातील सर्व जागांवर निवडणूक लढवत आहे. काँग्रेसच्या गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांची संख्या 31 इतकी आहे.
तर सत्तारुढ भाजपचे 16 टक्के उमेदवार कलंकित आहेत. पक्षाने गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या 14 उमेदवारांना मैदानात उतरविले आहे. भाजपच्या 12 टक्के उमेदवारांवर गंभीर गुन्हे नोंद आहेत. भारतीय ट्रायबल पार्टीच्या 4 उमेदवारांवर गुन्हे नोंद आहेत. पक्षाच्या एकूण 7 टक्के उमेदवारांवर गंभीर गुन्हे आहेत.
2017 च्या विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 15 टक्के उमेदवार कलंकित होते. तर 8 टक्के उमेदवारांवर गंभीर गुन्हे नोंद होते. गंभीर गुन्हे नोंद असलेल्या उमेदवारांमध्ये भाजपचे जनक तलविया अन् काँग्रेसचे वसंत पटेल सामील आहेत. भाजपचे पुरुषोत्तम सोलंकी, काँगेसच्या गनीबेन ठाकोर, जिग्नेश मेवाणी, आपचे गोपाल इटालिया अन् अल्पेश कठेरिया यांच्यावर गुन्हे नोंद आहेत.