राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांच्यावर पिंपरी-चिंचवडमध्ये शाईफेक करण्यात आली. शाईफेक करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
चंद्रकांत पाटील आज पिंपरी-चिंचवडमध्ये मोरया गोसावी या गणपती देवस्थानाच्या संजीवन समाधी सोहळ्याला हजेरी लावणार होते. यादरम्यान ते एका कार्यकर्त्याच्या घरी आले असता अज्ञात व्यक्तीने पाटील यांच्यावर शाईफेक केली. शाईफेक करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, या परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. परिसराला छावणीचे स्वरूप आले आहे.
महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी भीक मागून शाळा चालवल्या असे वादग्रस्त विधान चंद्रकांत पाटील यांनी केले होते. त्यामुळे त्यांच्याविरोधात विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.