आवाजामधील स्रोताचे रहस्य कायम
इंग्लंडमधील एका गावात अनोखे रहस्य लपलेले आहे. येथील लोक स्वतःच्या गावावर प्रचंड प्रेम करतात, परंतु त्यांना स्वतःच्या गावात रात्री निवांत झोप घेता येत नाही. या गावात चोर-दरोडेखोरांच्या भीतीमुळे नव्हे तर एका विचित्र आवाजामुळे लोकांची झोप उडाली आहे.
जगातील काही ठिकाणे ही एखाद्या रहस्यामुळे ओळखली जातात. इंग्लंडच्या यॉर्कशायरमधील हे गाव यापैकीच एक आहे. या गावात दिवसरात्र एक रहस्यमय आवाज ऐकू येत राहतो. गावाचे नाव होमफील्ड असून तेथे हा आवाज सहजपणे ऐकला जाऊ शकतो. एखादे इंजिन किवा वॉशिंग मशीनच्या आवाजाप्रमाणे दिवसरात्र हा आवाज लोकांच्या जीवनाला प्रभावित करत आहे. या आवाजामागील स्रोत कुणालाच शोधून काढता आलेला नाही.
इंग्लंडमधील गावात येणाऱया हमिंगयुक्त आवाजामागील कारण अद्याप कुणालाच जाणून घेता आलेले नाही. अनेक वर्षांपासून येथील रहिवासी अशाप्रकारचा आवाज ऐtन यामागील स्रोत जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. स्थानिक प्रशासनाने याचे कारण जाणून घेण्यासाठी एक सल्लागारही नियुक्त केला होता, परंतु त्यालाही या रहस्याची उकल करता आलेली नाही. हा आवाज एखादे वॉशिंग मशीन किंवा डिझेल इंजिन सुरू केल्यासारखा येतो असे स्थानिकांचे म्हणणे आहे. सातत्याने अशाप्रकारचा आवाज ऐकल्याने गावातील लोकांचे मानसिक आरोग्य प्रभावित होत आहे, कारण रात्री ते झोपू शकत नाहीत.
येथील लोकांना या आवाजामुळे कान आणि डोक्यात ताण जाणवतो. लोकांना स्वतःचे घर आणि गावाबद्दल प्रेम आहे, परंतु हा आवाज त्यांना त्रास देत आहे. 2019 मध्ये पहिल्यांदा हा आवाज लोकांना ऐकू आला आणि त्यांनी स्थानिक प्रशासनाला यासंबंधी कळविले होते, परंतु आवाजाचे कारण अद्याप समोर आलेले नाही.