देशभरातील रुग्णालयांमध्ये मॉक ड्रिल ः केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी घेतला राज्यनिहाय आढावा
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशभरातील विविध रुग्णालयांमध्ये कोविड-19 साठी आणीबाणीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी देशव्यापी मॉक ड्रिल (रंगीत तालीम) घेण्यात आले. चीन, अमेरिका आणि इतर काही देशांमध्ये कोविड-19 ची वाढती प्रकरणे लक्षात घेऊन ही विशेष आरोग्यविषयक यंत्रणा प्रात्यक्षिक मोहीम राबविण्यात आली. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी दिवसअखेर राज्यनिहाय माहिती जाणून घेतली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना कोविडचा सामना करण्यासाठी केंद्र सरकार सज्ज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच देशात कोरोनाची प्रकरणे वाढली तर आपली रुग्णालये पूर्णपणे सज्ज असावीत, असेही सुचविले.
जगभरात कोरोनाच्या संभाव्य धोक्मयाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकार अलर्ट मोडमध्ये आहे. केंद्राने राज्यांना कोणतीही परिस्थिती पेलण्यासाठी तयार राहण्याचा सल्ला दिला आहे. देशभरातील अनेक रुग्णालयांमध्ये मंगळवारी मॉक ड्रिलचे आयोजन करण्यात आले होते. दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात कोविड-19 वर आयोजित केलेल्या मॉक ड्रिलची केंद्रीय आरोग्यमंत्री मांडविया यांनी वैयक्तिकरित्या पाहणी केली. कोविडशी लढण्यासाठी हे रुग्णालय पूर्णपणे सज्ज असून इतर रुग्णालयांमध्येही अशीच व्यवस्था निर्माण करावी, असे त्यांनी सांगितले.
वैद्यकीय सुविधांची चाचपणी
देशात कोरोनाचे रुग्ण वाढल्यास रुग्णालयांमध्ये लोकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी देशभरात मॉक ड्रिल घेण्यात आले. यादरम्यान देशभरातील रुग्णालयांमध्ये उपलब्ध संसाधनांचे मूल्यांकन करण्यात आले. यामध्ये ऑक्सिजन प्लान्ट, व्हेंटिलेटर, लॉजिस्टिक आणि मानवी संसाधनांवर विशेष लक्ष केंद्रित करून पायाभूत सुविधांची सुसज्जता तपासण्यात आली. तसेच क्वारंटाईन बेड, ऑक्सिजन बेड आणि आयसीयू बेड तसेच डॉक्टर आणि इतर आरोग्य कर्मचाऱयांची उपलब्धता याकडे विशेष लक्ष देण्यात आले.
काही रुग्णालयांमध्ये सुविधांची वानवा उघड
मॉक ड्रिलदरम्यान कोरोनाला तोंड देण्यासाठी अनेक ठिकाणी तयारी अपूर्ण असल्याचे दिसून आले. तर काही ठिकाणी तयारीच झालेली नसल्याचेही पहावयास मिळाले. राजस्थानमधील अजमेर येथील जवाहरलाल नेहरु रुग्णालयात बंद पडलेला ऑक्सिजन प्लान्ट लवकरच सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दुसरीकडे, भोपाळच्या जिल्हा रुग्णालयातील ऑक्सिजन प्लान्टचा वीजपुरवठा दीड महिन्यांपासून खंडित झाल्याचे समोर आले आहे. सरकारने मॉकड्रिलच्या सूचना दिल्यावर एल अँड टी कंपनीच्या अभियंत्यांनी प्लान्टची दुरुस्ती सुरू केली असली तरी त्याला आणखी काही दिवस लागणार आहेत. लखनौमध्ये उपमुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री ब्रजेश पाठक यांनी स्वतः इस्पितळाला भेट देत पाहणी केली असता बरेच रुग्ण थंडीने कुडकुडत असल्याचे दिसून आले. राजस्थानमधील अजमेर येथे जवाहरलाल नेहरू हॉस्पिटलमध्ये मॉकड्रिलदरम्यान ऑक्सिजन पुरवठय़ाची चाचणी घेण्यात आली.
डॉक्टर-आयएमए यांचीही बैठक
जगात कोरोनाच्या संभाव्य धोक्मयाच्या बातम्या येत असतानाच देशात आरोग्य अधिकाऱयांच्या बैठका, मार्गदर्शक तत्त्वे आदींची तयारीही सुरू झाली आहे. 26 डिसेंबर 2022 रोजी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी यासंदर्भात डॉक्टर आणि आयएमएच्या प्रतिनिधींशी चर्चा केली होती. याप्रसंगी आरोग्यमंत्र्यांनी लोकांमधील दहशत दूर करण्यासाठी आणि अविश्वसनीय माहिती टाळण्यासाठी अचूक माहिती देऊन कोरोनाविरुद्धच्या लढय़ात सामील होण्याचे आवाहन केले.
विदेशातून येणाऱयांची तपासणी सुरू
कोविडच्या संभाव्य धोक्मयाला तोंड देण्यासाठी सरकारने यापूर्वीच ठोस पावले उचलली आहेत. परदेशातून येणाऱया सर्व प्रवाशांची तपासणी सुरू आहे. सर्व यंत्रणांना पुन्हा एकदा अलर्ट करण्यात आले आहे. यासोबतच लोकांना कोरोनाच्या विळख्यातून वाचवता यावे यासाठी सरकार जनजागृती कार्यक्रमही राबवत आहे. कोरोनाविरोधातील या लढय़ात सतर्क राहणे आणि सावधानता बाळगण्याचे आवाहन केंद्र सरकारने देशवासियांना केले आहे. आरोग्य विभागाने देशभरात रुग्णालयांमध्ये कोविड चाचणीचे प्रमाणही वाढवले आहे. ताप, सर्दी यासह वेदनांनी त्रस्त असलेल्या रुग्णांना कोरोना चाचणी करण्याचा सल्ला दिला जात आहे.