क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
उत्तर कर्नाटकात प्रथमच आ. अनिल बेनके चषक पाच लाखाचे पहिले बक्षीस व अडीच लाखाचे दुसरे बक्षीसाचे भव्य निमंत्रीतांची ऑल इंडिया क्रिकेट स्पर्धा 6 जानेवारीपासून सरदार हायस्कूल मैदानावरती होणार असून मालिकावीरासाठी रॉयल इन्फिल्ड हंटर 350 सीसी दुचाकी बक्षीस देण्यात येणार आहे, अशी माहिती आमदार अनिल बेनके यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कॅम्प येथील मेसॉनिक हॉल येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेवेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, उत्तर कर्नाटकात प्रथमच इतक्या भव्य बक्षीस रकमेची टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत पहिल्या 48 संघांना प्राधान्य देण्यात येणार आहे. या स्पर्धेत कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात, आंध्रप्रदेश, उत्तरप्रदेश, हैद्राबाद, दिल्ली, केरळ व गोवा येथून संघ येणार आहेत. स्थानिक जिल्हा संघांनाही प्राधान्य देण्यात आले आहे. या स्पर्धेतील विजेत्या संघाला रोख पाच लाख रु. व भव्य आकर्षक चषक तर उपविजेत्या संघाला अडीच लाख रु. रोख व आकर्षक चषक देण्यात येणार आहे. तर मालिकावीरासाठी रॉयल इन्फिल्ड हंटर 350 सीसी दुचाकी वाहन देण्यात येणार आहे. त्याशिवाय उत्कृष्ट फलांदाज, गोलांदाज, क्षेत्ररक्षक, यष्टीरक्षक, झेल, शिस्तबद्ध संघ, प्रत्येक संघातील सामनावीर अशी वैयक्तिक बक्षीसे देण्यात येणार आहेत. सरदार्स हायस्कूलच्या मैदानावर क्रिकेट शौकिनांना गॅलरीची तसेच स्क्रिनची व्यवस्था करण्यात आली आहे.
तरी इच्छुक संघांनी 3 जानेवारी सायं. 5.30 पर्यंत आपली नावे नोंदवावित असे आव्हान करण्यात आले आहे. यावेळी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.