वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
चॅटबॉट बार्ड सुरु केल्यानंतर गुगलला तोटा सहन करावा लागला आहे. त्यामुळे बुधवारी गुगलची मूळ कंपनी अल्फाबेटच्या समभागात मोठी घसरण झाली. माध्यमांनुसार, बार्ड लॉन्च झाल्यानंतर सुमारे 100 अब्ज डॉलर्स म्हणजेच 8250 अब्ज रुपये कंपनीचे बुडाले आहेत. याचे कारण गुगलचा प्रमोशनल व्हिडिओ असल्याचे सांगितले जात आहे, ज्यामध्ये चूक झाल्याचे समोर आले आहे.
जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपकडून कोणत्या नव्या उपलब्धी समोर आल्या आहेत ज्या 9 वर्षाच्या मुलाला सांगू शकेन, असा प्रश्न बार्डला एकाकडून करण्यात आला होता. या प्रश्नावर बार्डने विविध उत्तरे दिली जी चुकीची असल्याचे समोर आले. गुगल ही कंपनी कृत्रिम बुद्धिमतेच्या कल्पकतेबाबतीत गेल्या कित्येक वर्षापासून आघाडी घेत आहे. पण बार्डच्या नव्या चॅटबॉटबाबत जे सध्याला घडले ते त्यांची चिंता वाढवणारी आहे.
चॅटजीपीटीला टक्कर देण्यास बार्ड बाजारात
चॅटजीपीटीला टक्कर देण्यासाठी गुगलने बार्ड बाजारात सादर केले आहे. गुगलने आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर 6 वर्षाचे काम केल्यानंतर आपले चॅटबॉट ‘बार्ड’ अनावरण केले आहे.