एअरबस, बोईंगकडून 500 नवीन विमाने खरेदी करण्यावर शिक्कामोर्तब
एअर इंडियाने जवळपास 100 अब्ज डॉलर्स रकमेची (जवळपास 8 लाख कोटी रुपये) 500 विमाने खरेदी करण्याच्या कराराला अंतिम रूप दिले आहे. एअरबस आणि बोईंग या कंपन्यांशी हा करार करण्यात आला असून येत्या सात ते आठ वर्षांमध्ये कंपनीला 430 नॅरोबॉडी आणि 70 वाईडबॉडी विमाने प्राप्त होणार आहेत. नागरी विमान वाहतूक इतिहासातील हा सर्वात मोठा करार असल्याचे मानले जात असून त्याला ‘मदर ऑफ ऑल एव्हिएशन डील’ असे संबोधण्यात आले आहे.
‘टाटा सन्स’ने एअर इंडियासाठी केलेल्या करारांतर्गत प्रेंच कंपनी एअरबस आणि अमेरिकन कंपनी बोईंगकडून ही विमाने खरेदी करणार आहे. वृत्तानुसार, एअर इंडिया एअरबसकडून 280 विमाने खरेदी करणार आहे, त्यापैकी 240 सिंगल एक्सल ए-320एनईओएस आणि 40 वाईड बॉडी ए-350एस असतील. तर बोईंग उर्वरित 210 विमानांचा पुरवठा करणार असल्याचे सांगण्यात आले. ही ऑर्डर एअर इंडियासाठी असली तरी ती कमी किमतीच्या एअर एशिया आणि एअर इंडिया एक्स्प्रेससाठी देखील असणार आहे.
करारामध्ये एअरबसचा मोठा हिस्सा
अहवालानुसार, एअरबसने या ऑर्डरचा मोठा भाग मिळवला आहे. एअरबस 240 ए-320 निओ आणि 40 ए-350 विमानांची ऑर्डर पूर्ण करेल, तर बोईंग कंपनी 737-मॅक्स दर्जाची 190 आणि 787 दर्जाची 20 व 777 दर्जाची 10 अशी एकंदर 220 विमानांचा पुरवठा करेल. त्याची औपचारिक घोषणा पुढील आठवडय़ात होण्याची शक्मयता आहे. त्याचे मूल्य सुमारे 150 अब्ज डॉलर इतके असले तरी करार मोठा असल्यामुळे कंपनीला मोठी सवलत अपेक्षित आहे.
कोरोना महामारीनंतर आता एअरलाईन्स कंपन्या स्वतःला अपग्रेड करण्यात व्यग्र आहेत. कोरोनामुळे लागू करण्यात आलेले निर्बंध हटवल्यानंतर आता हवाई प्रवाशांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. टाटा समूहाने एअर इंडिया विकत घेऊन एक वर्ष झाले आहे. अशा परिस्थितीत टाटा समूहाच्या देखरेखीखाली कंपनी मोठय़ा बदलातून जात आहे.
भारतीय बाजारपेठेत एअरबसचे वर्चस्व
भारतीय बाजारपेठेत एअरबसचे वर्चस्व आहे. भारतातील नागरी विमान वाहतूक बाजारातील प्रमुख इंडिगो ही एअरबस ए-320 ची जगातील सर्वात मोठी ग्राहक आहे. भारतात नॅरोबॉडी एअरक्राफ्टसाठी एवढी मोठी ऑर्डर मिळवणे हे बोईंगसाठी मोठी उपलब्धी ठरली आहे. एअरबससोबतचा करार शुक्रवारी झालेल्या बैठकीत निश्चित करण्यात आल्याचे अहवालात म्हटले आहे. टाटा सन्सचे चेअरमन एन चंद्रशेखरन आणि एअरबसचे चीफ कमर्शिअल ऑफिसर ख्रिश्चियन शायर उपस्थित होते. मुंबईतील टाटा सन्सचे मुख्यालय असलेल्या बॉम्बे हाऊसमध्ये 29 जानेवारी रोजी बोईंगसोबत करार करण्यात आला होता. या कराराला आता मूर्त स्वरुप देण्यात आले आहे.
एअर इंडियाची इंडिगोशी स्पर्धा
नॅरोबॉडी विमानांच्या माध्यमातून एअर इंडिया 4-5 तासांच्या कमी अंतराच्या शहरांमधील सेवा देऊ शकेल. यामुळे, सध्या देशांतर्गत बाजारपेठेतील 50 टक्के पेक्षा जास्त भाग व्यापलेल्या इंडिगोला ती टक्कर देऊ शकेल. तर, वाईड बॉडी एअरक्राफ्टमुळे टाटाला उत्तर अमेरिका, युरोप आणि ऑस्ट्रेलियामध्ये पाऊलखुणा विस्तारण्यास मदत होईल. एअर इंडियाच्या ताफ्यात 2024 च्या अखेरीस सुमारे 50 नवी विमाने येण्याची शक्मयता आहे.
विस्तार वाढविण्याचे लक्ष्य
गेल्या वषीच्या सुरुवातीला एअर इंडिया ताब्यात घेतल्यापासून, टाटा समूह आपल्या ताफ्यात सुधारणा करण्यासाठी विमान उत्पादकांशी चर्चा करत आहे. अलीकडेच, एअर इंडियाला पुढील 5 वर्षांत देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय दोन्ही मार्गांवर आपला बाजार हिस्सा 30 टक्क्यांनी वाढवायचा आहे, असे एअर इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी कॅम्पबेल विल्सन म्हणाले होते.