महत्त्वपूर्ण करारांना अंतिम रूप मिळणे अपेक्षित
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू लवकरच भारत दौऱयावर येऊ शकतात, अशी माहिती इस्रायलचे भारतातील राजदूत निओर गिलन यांनी बुधवारी दिली. तसेच इस्रायलचे परराष्ट्रमंत्रीही भारतात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या भारत भेटीच्या तारखा निश्चित करण्याच्या दिशेने आम्ही काम करत आहोत, असे निओर गिलन म्हणाले. भारत आणि इस्रायल यांच्यातील मुक्त व्यापार कराराला दोन्ही देशांचे प्राधान्य आहे. त्यानुसार व्यापार आणि गुंतवणुकीतील अडथळे दूर करून अनेक महत्त्वाच्या करारांना मूर्त स्वरुप देण्याचा प्रयत्न नियोजित दौऱयात केला जाणार आहे. दोन्ही देशांमध्ये वार्षिक 8 अब्ज डॉलरचा व्यापार आहे. 2010 पासून दोन्ही देशांमध्ये मुक्त व्यापार करारासाठी चर्चा सुरू आहे.
भारत आणि इस्रायल यांच्यातील राजनैतिक संबंधांना 30 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने हरियाणातील भिवानी येथे सेंटर ऑफ एक्सलन्सचे उद्घाटन करण्यात आले. भारत इस्रायल कृषी प्रकल्पांतर्गत हे केंद्र विकसित करण्यात आले असून अर्ध-शुष्क पिकांवर संशोधन केले जाणार आहे. भारत आता प्रादेशिक शक्तीतून जागतिक शक्ती बनला आहे. भारत आणि इस्रायलमधील राजनैतिक संबंधांना 30 वर्षे पूर्ण झाली आहेत. अशा परिस्थितीत आम्ही हरियाणामध्ये सेंटर ऑफ एक्सलन्स सुरू केले असल्याचे गिलन यांनी स्पष्ट केले.