ऑनलाईन टीम / तरुण भारत :
अयोध्येतील निर्माणाधीन राम मंदिरासाठी चंद्रपुरातील सागवानाचा उपयोग करण्यात येणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारशहा डेपोतून सागवानाचे लाकूड बुधवारी (ता. 29) विधीवत पूजा करुन शोभायात्रेद्वारे अयोध्येकडे रवाना होणार आहे.
राम मंदिराची वास्तू जवळपास एक हजार वर्ष टिकावी, यासाठी वास्तूतज्ञांच्या मदतीने मंदिराची इमारत उभारण्यात येत आहे. मंदिराचे महाद्वार, गर्भगृहाचा दरवाजा, इतर दरवाजे यासाठी सागवान लाकडाची गरज आहे. चंद्रपुरातील सागवान हे देशात सर्वोत्तम मानले जाते. त्यामुळे मंदिर निर्माण समितीने वनमंत्री मुनगंटीवार यांच्याकडे पत्राद्वारे फॉरेस्ट डेव्हलपमेंट कार्पोरेशन ऑफ महाराष्ट्र लिमिटेडच्या डेपोतून चंद्रपूर जिल्ह्यातील सागवान काष्ठा पुरविण्याची मागणी केली होती. मुनगंटीवारांनी या विषयात व्यक्तिशः लक्ष घालत सर्वोत्तम दर्जाचे सागवान अयोध्येला पाठविण्याकरिता नियोजन करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱयांना दिल्या होत्या.
त्यानुसार सागवानचे हे लाकूड बुधवारी दुपारी 3.30 वाजता विधीवत पूजा करून शोभायात्रेद्वारे अयोध्येकडे रवाना होणार आहे. सागवान काष्ठाचा पुरवठा केल्याबद्दल श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह वने, सांस्कृतिक कार्यमंत्री व चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आभार मानले आहेत.