वृत्तसंस्था/ मुंबई
रिलायन्स कंपनीची सहकारी रिलायन्स जिओने देशभरात 1 लाखापर्यंत टॉवर्स उभारले असल्याची माहिती आहे. दूरसंचार विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार रिलायन्स जिओने दोन फ्रिक्वेन्सीकरिता 99,897 टॉवर्सची उभारणी केली आहे. 5 जी सेवा जास्तीत जास्त लोकापर्यंत चांगल्या क्षमतेसह उपलब्ध करून देण्याचा मानस कंपनीचा असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.
वेगवान इंटरनेट वापरासह इतर सुविधा जिओकडून आगामी काळात ग्राहकांना मिळू शकणार आहेत. 700 मेगाहर्टज आणि 3500 मेगाहर्टज या गटामध्ये जवळपास 1 लाखाएवढे टॉवर्स उभारले गेले आहेत. या तुलनेमध्ये प्रतिस्पर्धी कंपनी भारती एअरटेल यांच्याकडून 22,219 टॉवर्सची उभारणी करण्यात आल्याचे सांगितले जाते.
इंटरनेट स्पीड जिओच पुढे
इंटरनेट स्पीडच्या बाबतीमध्ये रिलायन्स जिओ सर्वोत्तम राहिले आहे. अलीकडच्या एका अहवालामध्ये 506 एमबीपीएस (मेगाबाईट्स प्रति सेकंद) इतका इंटरनेट डाऊनलोडचा वेग राहिला आहे. या तुलनेमध्ये एअरटेलचा वेग 268 एमबीपीएस इतका आहे.