प्रतिसाद थंडावला : परिवहनला फटका
प्रतिनिधी/ बेळगाव
महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सुरू करण्यात आलेल्या पिंक बससेवेकडे महिलांनी पाठ फिरविली आहे. या बससेवेला प्रवाशांचा प्रतिसाद थंडावल्याने ही बससेवा अडचणीत आली आहे.
महिलांचा प्रवास सुरक्षित व्हावा, यासाठी परिवहनने 26 जानेवारीपासून शहरात ही बससेवा सुरू केली होती. मात्र, नव्याचे नऊ दिवस याप्रमाणे काही दिवसातच ही बससेवा विस्कळीत झाली आहे. प्रवासादरम्यान महिलांची छेडछाड करणे आणि इतर प्रकार वाढले आहेत. त्यामुळे विविध संघटनांकडून महिलांसाठी विशेष बससेवा सुरू करावी, अशी मागणी होत होती. या मागणीनुसार शहरात तीन बस सोडण्यात आल्या आहेत. मात्र, या बसना महिला प्रवाशांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळेनासा झाला आहे. त्यामुळे परिवहनला ही बससेवा नाईलाजास्तव चालवावी लागत आहे.
सार्वजनिक बसमध्ये महिलांसाठी 50 टक्के राखीव सीट असल्या तरी सकाळी व सायंकाळी गर्दीच्या वेळेस महिलांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. महिलांची गर्दी असलेल्या मार्गांवर विशेष बस सुरू करण्यात आली आहे. मात्र, ही बससेवा महिलांच्या प्रतिसादाअभावी अनियमित झाली आहे.
ए. वाय. शिरगुप्पीकर (डेपो मॅनेजर)
डिझेल खर्चही निघणे कठीण
महिलांच्या सुरक्षिततेचा विचार करून तीन ठिकाणी विशेष बस सुरू केली आहे. मात्र, महिलांचा प्रतिसाद मिळत नसल्याने डिझेलचा खर्चही निघणे कठीण झाले आहे. त्यामुळे नाईलाजास्तव ही बससेवा चालवली जात आहे. वडगाव, अनगोळ आणि मजगाव अशा तीन मार्गांवर ही बससेवा सुरू आहे.