ऑनलाईन टीम / तरुण भारत :
केंद्रीय निमलष्करी दलात भरतीसाठी हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त आता 13 प्रादेशिक भाषांमध्येही परीक्षा देता येणार आहे. CRPF मध्ये स्थानिक तरुणांचा सहभाग वाढवण्यासाठी आणि प्रादेशिक भाषांना प्रोत्साहन देण्यासाठी गृहमंत्री अमित शाह यांच्या पुढाकाराने हा निर्णय घेण्यात आला आहे.
CRPF ची भरती परीक्षा ही स्टाफ सिलेक्शन कमिशनद्वारे आयोजित प्रमुख परीक्षांपैकी एक आहे. यामध्ये देशभरातून लाखो उमेदवार भाग घेतात. प्रादेशिक भाषांना प्रोत्साहन देण्यासाठी 1 जानेवारी 2024 पासून CRPF भरती परीक्षेतील प्रश्नपत्रिका हिंदी-इंग्रजी व्यतिरिक्त मराठी, आसामी, बंगाली, गुजराती, मल्याळम, कन्नड, तमिळ, तेलगू, ओडिया, उर्दू, पंजाबी, मणिपुरी आणि कोकणी भाषेत सेट केली जाणार आहे. त्यामुळे लाखो उमेदवारांना त्यांच्या मातृभाषेतून ही परीक्षा देता येईल.
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी अमित शाह यांना पत्र लिहून केंद्रीय राखीव पोलीस दल भरती परीक्षा अनेक प्रादेशिक भाषांमध्ये घेण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार गृहमंत्रालयाने यासंदर्भात निर्णय घेतला.