पथिरानाचे 3 बळी, चेन्नई गुणतक्त्यात दुसऱ्या स्थानावर
वृत्तसंस्था/ चेन्नई
2023 च्या टाटा आयपीएल चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेतील येथील चिदंबरम स्टेडियमवर खेळविण्यात आलेल्या 55 व्या सामन्यात चेन्नई सुपरकिंग्जने दिल्ली कॅपिटल्सचा 27 धावांनी पराभव करत गुणतक्त्यात 12 सामन्यातून 15 गुणासह आपले स्थान अधिक भक्कम केले. मात्र, दिल्ली कॅपिटल्सला 8 गुणासह शेवटच्या स्थानावर समाधान मानावे लागत आहे. या स्पर्धेत दिल्लीचे तीन सामने तर चेन्नईचे दोन सामने बाकी आहेत. 21 धावा व एक बळी मिळविणाऱ्या जडेजाला सामनावीर पुरस्कार मिळाला.
दिल्ली कॅपिटल्सने भेदक मारा करीत यजमान चेन्नई सुपरकिंग्जला 167 धावांवर रोखले. चेन्नईने 20 षटकात 8 बाद 167 धावा जमवत दिल्लीला विजयासाठी 168 धावांचे आव्हान दिले. या सामन्यात चेन्नईच्या एकाही फलंदाजाला 30 धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. दिल्लीच्या मिचेल मार्शने 3 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना दिल्ली कॅपिटल्सने 20 षटकात 8 बाद 140 धावापर्यंत मजल मारल्याने त्यांना हा सामना गमवावा लागला.
दीपक चहर, मथिशा पथिराना, तुषार देशपांडे आणि जडेजा यांच्या शिस्तबद्ध आणि अचूक गोलंदाजीसमोर दिल्ली कॅपिटल्सला 168 धावांचे आव्हान पेलवले नाही. दिल्लीच्या डावात सलामीचा कर्णधार वॉर्नर पहिल्याच षटकातील दुसऱ्या चेंडूवर खाते उघडण्यापूर्वी झेलबाद झाला. चेन्नईच्या दीपक चहरने दिल्लीला हा पहिला धक्का दिल्यानंतर त्याने आपल्या दुसऱ्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर सॉल्टला झेलबाद केले. त्याने 11 चेंडूत 2 षटकार आणि 1 चौकारासह 17 धावा जमवल्या. मिचेल मार्श रहाणेच्या चपळ क्षेत्ररक्षणामुळे 5 धावांवर धावचित झाला. मनीष पांडे आणि रॉसो यांनी संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न करताना चौथ्या गड्यासाठी 59 धावांची भागीदारी केली. दिल्लीने पॉवरप्ले दरम्यानच्या सहा षटकात 47 धावा जमवताना तीन गडी गमवले, इथेच त्यांना मोठा फटका बसला. दिल्लीचे पहिले अर्धशतक 47 चेंडूत फलकावर लागले तर पांडे आणि रॉसो यांनी अर्धशतकी भागीदारी 51 चेंडूत नोंदवली. दिल्लीचे शतक 99 चेंडूत फलकावर लागले. तत्पूर्वी पथिरानाने मनीष पांडेला पायचित करून आपल्या संघासमोरील मोठा अडथळा दूर केला. पांडेने 29 चेंडूत 2 षटकार आणि 1 चौकारासह 27 धावा जमवल्या. त्यानंतर रवींद्र जडेजाने रॉसोला डावातील 15 व्या षटकात झेलबाद केले. रॉसोने 37 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारासह 27 धावा जमवल्या. अष्टपैलू अक्षर पटेल उत्तुंग फटका मारण्याच्या नादात रहाणेकरवी झेलबाद झाला. पथिरानाचा हा दुसरा बळी ठरला. अक्षर पटेलने 12 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारासह 21 धावा जमवल्या. रिपल पटेल 10 धावावर धावचित झाला. 19 व्या षटकातील पाचव्या चेंडूवर रिपल पटेल बाद झाल्यानंतर पथिरानाकडे डावातील शेवटचे षटक टाकण्याची जबाबदारी कर्णधार धोनीने सोपवली होती. पथिरानाने या षटकातील पाचव्या चेंडूवर ललित यादवचा त्रिफळा उडविला. त्याने 5 चेंडूत 3 चौकारासह 12 धावा जमवल्dया. कुलदीप यादव शून्यावर नाबाद राहिला. दिल्लीला अवांतराच्या रुपात 11 धावा मिळाल्या. त्यांच्या डावात 6 षटकार आणि 10 चौकार नोंदवले गेले. चेन्नईतर्फे पथिरानाने 37 धावात 3, दीपक चहरने 28 धावात 2, जडेजाने 19 धावात एक गडी बाद केला. दिल्लीचे दोन फलंदाज धावचित झाले.
दुबेच्या 12 चेंडूत 25 धावा
या सामन्यात चेन्नई सुपरकिंग्जने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. गायकवाड आणि कॉनवे या सलामीच्या जोडीने 25 चेंडूत 32 धावांची भागीदारी केली. अक्षर पटेलने कॉनवेला 10 धावावर पायचित केले. चेन्नईने पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकात 49 धावा जमवताना 1 गडी गमवला. चेन्नईचे पहिले अर्धशतक 39 चेंडूत फलकावर लागले. अक्षर पटेलने ऋतुराज गायकवाडला झेलबाद केले. त्याने 18 चेंडूत 4 चौकारासह 24 धावा जमवल्या. कुलदीप यादवने मोईन अलीला सात धावावर झेलबाद केले. फॉर्ममध्ये असलेला अजिंक्य रहाणेला ललित यादवने स्वत:च्याच गोलंदाजीवर अप्रतिम झेल टिपत बाद केले. त्याने 20 चेंडूत 2 चौकारासह 21 धावा जमवल्या. चेन्नईचे शतक 80 चेंडूत फलकावर लागले. शिवम दुबे आणि रायुडू या जोडीने पाचव्या गड्यासाठी 36 धावांची भर घातली. मार्शने दुबेला वॉर्नरकडे झेल देण्यास भाग पाडले. त्याने 12 चेंडूत 3 षटकारासह 25 धावा फटकावल्या. नंतर खलिल अहमदने रायुडूचा बळी मिळवला. रायुडूने 17 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह 23 धावा केल्या. अष्टपैलू रवींद्र जडेजाने 16 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह 21 धावा जमविल्या तर कर्णधार धोनीने 9 चेंडूत 2 षटकार आणि 1 चौकारासह 20 धावा फटकावल्या. चेन्नईचे दीडशतक 112 चेंडूत फलकावर लागले. चेन्नईच्या डावात 7 षटकार आणि 10 चौकार नोंदवले गेले. त्यांना अवांतराच्या रुपात 15 धावा मिळाल्या. त्यामध्ये 10 वाईड आणि 4 लेगबाईजचा समावेश आहे. दिल्लीतर्फे मिशेल मार्शने 18 धावात 3, अक्षर पटेलने 27 धावात 2 तसेच खलिल अहमद, ललित यादव आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी एक बळी मिळवला.
संक्षिप्त धावफलक : चेन्नई सुपरकिंग्ज 20 षटकात 8 बाद 167 (गायकवाड 18 चेंडूत 24, कॉनवे 13 चेंडूत 10, रहाणे 20 चेंडूत 21, मोईन अली 7, दुबे 12 चेंडूत 25, रायुडू 17 चेंडूत 23, जडेजा 16 चेंडूत 21, धोनी 9 चेंडूत 20, अवांतर 15. गोलंदाजी : मिचेल मार्श 3-18, अक्षर पटेल 2-27, खलिल अहमद 1-32, ललित यादव 1-34, कुलदीप यादव 1-28).
दिल्ली कॅपिटल्स 20 षटकात 8 बाद 140 (डेविड वॉर्नर 0, सॉल्ट 11 चेंडूत 17, मिचेल मार्श 5, मनीष पांडे 29 चेंडूत 27, रॉसो 37 चेंडूत 35, अक्षर पटेल 12 चेंडूत 21, रिपल पटेल 10, ललित यादव 5 चेंडूत 12, अमन खान नाबाद 2, अवांतर 11. गोलंदाजी : पथिराना 3-37, दीपक चहर 2-28, रवींद्र जडेजा 1-19).