5364 मिटर्स उंचीवरील बेस कॅम्स केला सर
फोंडा : कोणताही चांगला छंद माणसाला यशोशिखरावर नेऊ शकतो, हे शनायाच्या कामगिरीतून पुन्हा एकदा सिद्ध झालेले आहे. मडगाव येथील तेरा वर्षीय बालिका शनाया गौतम वेर्लेकर हिने छंद जोपासला तो जगातील सर्वांत उंच पर्वतशिखर म्हणजे माऊंट एवरेस्ट सर करण्याचा आणि आई वडिलांच्या साहाय्याने तिने तो पूर्णही केला. लहान वयात एव्हरेस्ट शिखराचा बेस कॅम्प सर करण्याची साहसी कामगिरी पूर्ण केल्याबद्दल शनाया वेर्लेकर हिच्यावर सध्या कौतुकाचा वर्षावर होत आहे. मडगावच्या मनोविकास विद्यालयात सातवीच्या वर्गात शिकणारी शनाया या कामगिरीबद्दल बोलताना, आई वडिलांचे पाठबळ, आपल्या अंगी असलेला आत्मविश्वास व बॅडमिंटन कोच शर्मद महाजन यांच्या मार्गदर्शनामुळे हे शक्य झाल्याचे म्हणाली.
मौजमजेपेक्षा साहसी छंदात रस
उन्हाळ्याच्या सुट्टीत मुले एखाद्या समर कॅम्पमध्ये किंवा सहलीसाठी जातात. पण शनाया मात्र सुट्टी पडण्यापूर्वीच माऊंट एवरेस्ट शिखर सर करण्याचे नियोजन करीत होती. तिचे वडील गौतम वेर्लेकर हे मडगाव येथील प्रसिद्ध चार्टर्ड अकाऊटंट तर आई करिश्मा या ऑफीसचे काम सांभाळतानाच लेकीचे छंद व आवड पूर्ण करण्यासाठी धडपडते. शनायाच्या आई वडिलांना गिर्यारोहणाची आवड असल्याने घरात सतत या विषयावर चर्चा असायची.
आईमुळे एव्हरेस्टबद्दल वाढले कुतुहल
मागच्या वर्षी करिश्मा वेर्लेकर या एव्हरेस्टवर जाऊन आल्या आहेत. त्यामुळे तिथल्या साहसी चर्चेने शनायाला एव्हरेस्टबद्दल कुतुहल निर्माण झाले. यंदाच्या उन्हाळी सुट्टीत एव्हरेस्ट सर करायचे तिने मनात पक्के ठरवले. तशी इच्छा आई वडिलांकडे बालहट्टाने व्यक्त केली. वडील कामात व्यस्त असल्याने मायलेकीने सर्व तयारीनिशी 1 ते 14 मे पर्यंत एव्हरेस्ट सर करण्याचे नियोजन केले.
… अन् एव्हरेस्टवर फडकविला तिरंगा
माऊंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वात उंच पर्वत शिखर असून त्याची उंची 8848 मीटर्स एवढी आहे. एवढी उंची गाठणे 13 वर्षीय शनायाला शक्य नव्हते. पण माऊंट एव्हरेस्टच्या बेस कॅम्पवर म्हणजेच 5364 मिटर सर करण्याचे धाडसी आव्हान तिने स्विकारले. 11 दिवसांचा प्रवास, 7 ते 8 डिग्री तापमान अशा प्रतिकुल स्थितीत तब्बल 130 किलोमीटर अंतर कापत शनाया व तिची आई करिश्मा या मायलेकीने माऊंट एव्हरेस्टच्या बेस कॅम्पवर तिरंगा फडकाविला.
प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली तयारी
शनाया ही चांगल्यापैकी बॅडमिंटन खेळाडू आहे. त्यामुळेच लवचिकता तिच्याकडे आहे. पण शिखर सर करण्यासाठी शारीरिक मेहनत, तिथल्या वातावरणाशी मिळते जुळते घेणे व आहार या काही महत्त्वाच्या गोष्टींशी जळवून घ्यावे लागते. तिचे कोच शर्मद महाजन यांनी याकामी विशेष मार्गदर्शन केले. आठवड्याच्या सुट्टीत पारोडा येथील चंद्रेश्वर पर्वतावर जाणे, जीम, व्यायाम, यामुळेच एव्हरेस्ट शिखरावर जाण्यासाठी दररोज 6 ते 7 तास चालणे असा पहाटे 5 वा. हा प्रवास सुरु व्हायचा. शनायाच्या सोबतीला तिची आई होती, तरी तिच्या अंगी असलेल्या धाडसाचे आणि आत्मविश्वासाचे कौतुक होणे गरजेचे आहे.
वेर्लेकर कुटुंबीय क्रीडाप्रेमी
शनाया ही चांगल्यापैकी बॅडमिंटन खेळाडू असून आई करिश्मा ही टेबल टेनिस खेळाडू आहे. त्यांनी दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय पातळीवरील टेबल टेनिस स्पर्धेत गोव्याचे प्रतिनिधीत्व केले आहे. वेर्लेकर कुटुंबीय व क्रीडा क्षेत्राचे जवळचे नाते आहे. कारण वेर्लेकर कुटुंबातील अनेक सदस्य हे चांगल्यापैकी टेबल टेनिस खेळाडू आहेत.
अभ्यास करता करता पूर्ण करायचेत छंद!
शनाया सांगते माऊंट एव्हरेस्ट बेस कॅम्पपासून तळाशी आल्यावर एक प्रकारचा वेगळा आनंद व आत्मविश्वास जाणवत होता. तो शब्दात सांगणे कठीण. पण माऊंट एव्हरेस्टला टाटा बाय बाय करताना सांगून आलेय, पुढील सुट्टीत नक्की येईन 5364 मिटरपेक्षा अधिक अंतर सर करण्यासाठी…! तोपर्यंत लक्ष अभ्यासाकडे कारण अभ्यास करता करता छंद पूर्ण करायचे आहेत !