वरिष्ठांकडून सूचना आल्याने अधिकाऱ्यांनी केली रस्त्याची पाहणी
वार्ताहर /रामनगर
अनमोड घाटमार्ग गेल्या चार वर्षापासून अधिकृतरित्या बंद स्थितीत होता. काही दिवसापूर्वी कारवार जिल्हाधिकाऱ्यांनी सदर मार्ग अधिकृतरीत्या खुला करण्याबाबत आदेश जारी केला आहे. सदर आदेशामध्ये अवजड वाहनांना सायंकाळी सात ते पहाटे सहापर्यंत अवकाश दिला आहे. त्यामुळे अडीचशे किलोमीटर फेरा मारून कारवार-यल्लापूरमार्गे धावणारी अवजड वाहने अनमोड घाटमार्गावरून रात्रीच्या वेळी धावू लागली. परंतू हा आदेश देऊन आठ ते दहा दिवस न होताच गोवा-बेळगाव महामार्गावरील तिनईघाट-देवळीनजिक रेल्वे गेटपाशी डबल ट्रॅक तसेच गेटपासून दोन्ही बाजूला 200 मीटर रेल्वेच्या आराखड्याप्रमाणे रस्ता बनवण्यासाठी 28 दिवस रस्ता पुन्हा बंद करण्याची सूचना रेल्वे विभागाने जिल्हाधिकाऱ्यांना दिली आहे. त्यामुळे कारवार जिल्हाधिकाऱ्यांनी सात दिवसाच्या आत पर्यायी मार्ग शोधण्याच्या सूचना दिल्याने मंगळवारी सकाळी देवळी रेल्वे गेटजवळ आयएस अधिकारी जोबिन महापात्र तसेच जोयडा तहसीलदार चव्हाण, दांडेली डीवायएसपी सदानंद कटगी, सीपीआय महांतेश होस्पेट, रामनगर पीएसआय बसवराज मबनूर तिनईघाट भट तसेच आरटीओ विभाग व अन्य सरकारी अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.
सध्या या मार्गावरून 200 ते अडीचशे बसेस धावत आहेत. तसेच कर्नाटकातून गोवा येथे मोठ्याप्रमाणात भाजी, दूध व इतर सामग्रीही जात आहेत. पर्यायी रस्त्यावरून सदर वाहनेही जाऊ शकत नसल्याने सदर मार्ग पुन्हा बंद करण्याच्या आदेशाला सर्वत्र विरोध होत आहे. तर कारवार जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार उर्वरित रस्ताकाम करण्यासाठी पावसाळ्यानंतर रस्ता दोन महिने बंद करण्याचे सूचना अधिकृतरित्या करण्यात आली आहे. त्यामुळे सदर रेल्वे विभागाचे काम हे पावसाळ्यानंतर दोन महिने रस्ता बंद केल्यानंतर करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. तर सदर देवळी रेल्वेगेटजवळ काही दिवसातच ओव्हरब्रिज निर्माण होणार असून सध्या लाखो रुपये खर्च करून करण्यात येणार असलेला रेल्वे गेटजवळचा रस्ता व्यर्थ ठरणार आहे. त्यामुळे सदर रेल्वे गेटजवळ बनवण्यात येणाऱ्या रस्त्याला सर्व थरातून विरोध करण्यात येत आहे.