ऑनलाईन टीम / तरुण भारत :
ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी दाखल केलेल्या विनयभंग प्रकरणात शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांना क्लीनचिट देण्यात आली आहे. त्यामुळे शिरसाट यांना या प्रकरणात दिलासा मिळाला आहे.
छत्रपती संभाजीनगर येथे एका कार्यक्रमात बोलताना संजय शिरसाट यांनी सुषमा अंधारे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. या वक्तव्याविरोधात अंधारे यांनी शिरसाट यांच्या विरोधात विनयभंग, बदनामी आणि अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला होता. हे प्रकरण संभाजीनगरमधील असल्याने ते स्थानिक पोलिसांकडे वर्ग करण्यात आले. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करत विनयभंग प्रकरणात शिरसाट यांना क्लीनचिट दिली.
शिरसाट यांनी केलेल्या वक्तव्यावेळी अंधारे समोर नव्हत्या. त्यामुळे हा विनयभंग होऊ शकत नाही, असा निष्कर्ष पोलिसांनी नोंदवला आहे. यासंदर्भातील पत्र संभाजीनगर पोलिसांनी अंधारे यांना पाठविले आहे.