थिएगो वाईल्ड, मोनफिल्स, रीबाकिना, स्वायटेक, व्हेरेव्ह, होल्गर रुने दुसऱ्या फेरीत
वृत्तसंस्था/ पॅरिस
द्वितीय मानांकित रशियाच्या डॅनील मेदवेदेव्हला प्रेंच ओपन स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत धक्कादायक पराभव स्वीकारावा लागला. ब्राझीलच्या 23 वर्षीय थिएगो सेबॉल्ट वाईल्डने त्याला हा धक्का दिला. एलिना स्विटोलिना, रीबाकिना, इगा स्वायटेक, अलेक्झांडर व्हेरेव्ह, होल्गर रुने, गेल मोनफिल्स यांनी आगेकूच केली आहे.
जागतिक क्रमवारीत 172 व्या स्थानावर असणाऱ्या वाईल्डने मेदवेदेव्हवर 7-6, (7-5, 6-7 (8-10), 2-6, 6-3, 6-4 अशी मात केली. ‘ज्युनियर कारकिर्दीत मी मेदवेदेव्हचाच खेळ पाहत मोठा झालो. या कोर्टवर खेळण्याचे व त्यावर एखाद्या अशा खेळाडूला हरविण्याचे स्वप्न मी बाळगले होते, ते आज साकार झाले,’ असे सेबॉल्ट वाईल्ड सामन्यानंतर म्हणाला. मेदवेदेव्हने दोन वर्षांपूर्वी यूएस ओपन स्पर्धा जिंकली होती आणि त्याने अग्रस्थानही मिळविले होते. हार्डकोर्टवर त्याचे चांगले प्रदर्शन होते, पण रेड क्ले कोर्टवर तो तितकासा प्रभावी ठरत नाही. 2021 मध्ये त्याने येथे उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली होती तर मागील वर्षी तो चौथ्या फेरीपर्यंतच टिकला होता. सेबॉल्टने या मोसमात एकाही टूर लेव्हल स्पर्धेत प्रमुख ड्रॉमध्ये भाग घेतला नव्हता. त्याऐवजी तो एटीपी चॅलेंजर टूरवर खेळत होता. येथे प्रमुख ड्रॉमध्ये स्थान मिळविताना पात्रता फेरीत त्याने तीन सामने जिंकले आहेत.
व्हेरेव्हचे विजयी पुनरागमन
जर्मनीच्या अलेक्झांडर व्हेरेव्हने या स्पर्धेत पुनरागमन करताना लॉईड हॅरिसचा 7-6 (8-6), 7-6 (7-0), 6-1 असा पराभव केला. हा सामना तीन तासाहून अधिक काळ चालला होता. मागील वर्षी त्याला या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत नदालविरुद्ध खेळताना घोट्याची दुखापत झाल्याने त्याला सामना सोडून द्यावा लागला होता. या दुखापतीनंतर मागील वर्षी तो एकाही स्पर्धेत खेळू शकला नाही. 2017 व 2019 मध्ये त्याला या स्पर्धेत पहिल्याच फेरीत पराभव स्वीकारावा लागला होता. त्याची पुढील लढत स्लोव्हाकियाच्या अॅलेक्स मॉल्कनशी होणार आहे. डेन्मार्कचा सहावा मानांकित होल्गर रुनेने ख्रिस्तोफर युबँक्सचा 6-4, 7-6 (7-2), 6-2 असा पराभव केला. 20 वर्षीय रुनेने मागील वर्षी या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली होती.
स्विटोलिनाची आगेकूच
महिला एकेरीत युक्रेनच्या एलिना स्विटोलिनाने तिसरी फेरी गाठताना एका सेटची पिछाडी भरून काढत स्टॉर्म हंटवर 2-6, 6-3, 6-1 अशी मात केली. 2022 ऑस्ट्रेलियन ओपननंतर ती प्रथमच ग्रँडस्लॅम स्पर्धेत खेळत आहे. मॅटर्निटी लीव्हच्या ब्रेकनंतर तिने अलीकडेच पुनरागमन केले आहे. तिची पुढील लढत पाचव्या मानांकित कॅरोलिना गार्सिया किंवा रशियाच्या अॅना ब्लिन्कोव्हा यापैकी एकीशी होईल. स्विटोलिनाचा पती गेल मोनफिल्सनेही सेबास्टियन बाएझवर पाच सेट्सच्या रोमांचक लढतीत 3-6, 6-3, 7-5, 1-6, 7-5 अशी मात करीत दुसरी फेरी गाठली. गेल्या नऊ महिन्यातील त्याचा हा पहिलाच विजय आहे.
स्वायटेक विजयी
महिला एकेरीच्या अन्य एका सामन्यात विद्यमान विजेत्या पोलंडच्या इगा स्वायटेकने दुसरी फेरी गाठताना स्पेनच्या क्रिस्टिना बुक्साचा 6-4, 6-0 असा पराभव केला. जागतिक क्रमवारीत ती पहिल्या स्थानावर आहे. मात्र हे अग्रस्थान आर्यना साबालेन्का किंवा इलेना रीबाकिना तिच्याकडून हिसकावून घेऊ शकतात, अशी स्थिती आहे. स्वायटेकची पुढील लढत स्वित्झर्लंडची वायलेना इन अल्बन किंवा अमेरिकेची क्लेअर लियू यापैकी एकीशी होईल. इलेना रीबाकिनाने दुसऱ्या फेरीत स्थान मिळविताना झेकच्या ब्रेन्डा फ्रुहव्हर्टोव्हाचा 6-4, 6-2 असा पराभव केला. रीबाकिनाने याच महिन्यात क्ले कोर्टवरील इटालियन ओपन स्पर्धा जिंकली आहे. दुसऱ्या फेरीत तिची लढत झेकच्या लिंडा नोस्कोव्हाशी होईल.