कासेगाव प्रतिनिधी
वाळवा तालुक्यातील कासेगाव येथे आशियाई महामार्गावर अपघातांचे सत्र सुरूच असून आज ५ जून रोजी शिराळा आगारची बोरीवलीहून शिराळाकडे जाणारी एस टी बस व केटीएम कंपनीच्या मोटारसायकलमध्ये झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार स्वानंद तानाजी बांदल २२ रा. जांभूळवाडी हा तरुण जागीच ठार झाला आहे. ही घटना सोमवारी दुपारी दीडच्या सुमारास पुणे ते कोल्हापूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर भारत पेट्रोल पंपा शेजारी घडली याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, स्वानंद बांदल हा मोटारसायकल क्र. एम एच १० डी.यु. ९१४३ वरून घरी चालला होता तो कासेगाव येथील भारत पेट्रोलपंपा समोर आला असता एस टी बस क्र. एम एच १४ बी.टी. ४६३४ ला ओव्हरटेक करताना झालेल्या अपघातात एसटीचे चाक अंगावरून गेल्याने मृत्युमुखी पडला. याबाबत एसटी चालक सागर लक्ष्मण गुजले रा. चिकुर्डे याच्यावर कासेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोहेकॉ एस. जि. कुंभार करत आहेत. स्वानंद याच्या पश्चात आई, वडील, लहान भाऊ असा परिवार आहे.
पंधरा दिवसात पाच अपघात…दोन ठार
महामार्गाच्या कामामुळे कासेगाव परिसरात अपघातांचे प्रमाण वाढले असून गेल्या पंधरा दिवसात पाच अपघात झाले आहेत. यामध्ये दोन अपघातातील दुचाकीस्वार जागीच ठार झाले असून महामार्ग मृत्यूचा सापळा बनू लागला आहे.